Twitter : @therajkaran
पनवेल
भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आज पनवेलमध्ये आयोजित पक्षाच्या निर्धार मेळाव्यात भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले. आधी उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Uddhav Thackeray) आणि नंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (Sharad Pawar) फोडून त्यांना सत्तेत सहभागी करून घेतलेल्या राज्यातील भाजप नेत्यांवर टीका करताना राज ठाकरे यांनी त्यांना सल्ला दिला की, दुसऱ्यांच्या आमदारांना फोडून आणायच्या ऐवजी स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका आणि पक्ष बांधायला शिका.
मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai – Goa Highway) दुरावस्थेविरुद्धच्या आंदोलनाला झेंडा दाखवायला आलेले राज ठाकरे पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, भाजपने त्यांना मध्यंतरी सल्ला दिला की मनसेने रस्ते आणि टोल बांधायला पण शिकावे. राज पुत्र अमित (Amit Thackeray) यांना मुंबई – पुणे शीघ्रगती महामार्गावरील टोल नाक्यावर अडवल्यानंतर मनसैनिकांनी टोल नाक्याची (MNS vandalised toll plaza at Mumbai – Pune Expressway) तोडफोड केली होती. त्यावर भाजपने राज यांना सबुरीचा सल्ला देताना केवळ तोडफोड नको तर टोल बांधायला शिका, असा सल्ला दिला होता. राज यांनी आज संधी साधत भाजपाला प्रत्युत्तर दिले.
भाजपाला उद्देशून राज म्हणाले, त्यांना इतकंच सांगतो की, नको ते सल्ले आम्हाला देऊ नका. लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवायच्या आणि धाकावर लोकांना पक्षात घ्यायचं आणि त्यानंतर ती लोकं (अजित पवार) गाडीत झोपून जाणार. यानंतर “मी तुला दिसलो का? मी होतो का? ‘ असे विचारणार. म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस नाही का? अजित पवार म्हणे महाराष्ट्राचा विकास करायला सत्तेत गेलो. काय बोलताय ? पंतप्रधानांनी ७०,००० कोटींच्या घोटाळ्याची (scam worth 70 thousand crores by NCP) आठवण करून दिली आणि हे टुणकन निघाले. बहुधा भुजबळांनी (Chhagan Bhujbal) सांगितलं असेल जेलमध्ये काय काय असतं. ते (अजित पवार) म्हणाले असतील जेलपेक्षा भाजपकडे गेलेलं बरं, अशी टीका राज यांनी अजित पवार (Raj Thackeray criticised Ajit Pawar) यांच्यावर केली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल राज म्हणाले, आपण चंद्रावर जाऊ शकतो, पण महाराष्ट्रात चांगले रस्ते बांधू शकत नाही का? २००७ ला मुंबई-गोवा हायवेचं काम सुरु झालं, त्यानंतर इतकी सरकारं आली, पण रस्त्याचं काम झालंच नाही. आत्तापर्यंत मुंबई – गोवा महामार्गावर १५,६६६/- कोटी रुपये खर्च झाले याकडे लक्ष वेधून राज म्हणाले, तरीही रस्ता झाला नाही. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या.
ते पुढे म्हणाले, मी नितीनजींना (गडकरी) (Union Minister Nitin Gadkari) विनंती केली होती की तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला, तर ते म्हणाले की कॉन्ट्रॅक्टर पळून जातात. हे नेमकं मुंबई – गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं? कोकणाचा विकास (Development of Konkan) होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का, अशी शंका राज यांनी उपस्थित केली.
राज म्हणाले, मुंबई – गोवा महामार्गावर आजपर्यंत २५०० लोकं मृत्युमुखी पडलेत. अनेकांना दुखणी लागली आहेत, गाड्यांचं नुकसान झालं आहे. तरीही त्याच लोकांना निवडून देत आहेत, त्यामुळे हे पुन्हा – पुन्हा निवडून येणारे निवांत आहेत. ते टेंडर, टक्केवारीत व्यस्त आहेत. जे आज खोके – खोके ओरडत आहेत ना, त्यांच्याकडे कंटेनर आहेत. त्यांनी कोविड (Covid scam) पण सोडला नाही. निवडणुकीच्या वेळेस हे पुन्हा बाळासाहेबांच्या नावाने भावनिक करून मतं मागतील आणि आमची भोळीभाबडी जनता त्यांना पुन्हा भुलणार असेल तर याच नरकयातना पुन्हा भोगाव्या लागतील, असा इशारा त्यांनी दिला.
रस्ते खड्ड्यात गेले काय आणि आपण खड्ड्यात गेलो काय, आपल्या मतदारांना काहीच वाटत नाही, अशी खंत व्यक्त करून राज म्हणाले, फक्त कोकणातलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मुंबई ते नाशिक जायला ८ तास लागतात, त्या रस्त्याने शब्दशः हाल केले आहेत.
राज म्हणाले, २०२४ ला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल असं आता सरकार सांगतंय. चांगलंच आहे, हे व्हायलाच हवं. पण पुढे काय? मुंबई-पुणे रस्ता झाला, आणि पुणे पसरत गेलं. घडलं काय तर पुण्याची पार वाट लागली. पुण्यात मराठी माणूस आक्रसत चालला आहे. हेच कोकणात होणार आहे, असा इशारा देतांना राज म्हणाले, शिवडी- न्हावाशेवा रस्ता होणार तेव्हा बघा रायगड जिल्ह्याची काय अवस्था होते. तिथल्या जमिनी आधीच परप्रांतीयांनी विकत घेतल्या आहेत आणि पुढे जाऊन परिस्थिती अशी होणार कि फायदा होणार परप्रांतीयांचा आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे नोकऱ्या करणार. राज असेही म्हणाले, की, ते पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी माणसांच्या विरोधात नाही. त्यांच्या पक्षात अनेक अमराठी आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगडचा तालुकाध्यक्ष तर एक शीख सरदार आहे, याकडे राज यांनी लक्ष वेधले.
बारसुला होत असलेल्या विरोधचा उल्लेख करून राज म्हणाले, आधी नाणार, मग बारसूच्या प्रकल्पाच्या नावाखाली कोकणी माणसाच्या हजारो एकर जमिनी कोणी बळकवल्या त्याचा शोध घेतला गेला पाहिजे.
गोव्याच्या २०२३ च्या एका कायद्याचा उल्लेख करून राज म्हणाले, गोव्यात या कायद्यानुसार तुम्हाला सहज शेतजमीन घेता येणार नाही आणि घेतली तर तिकडे शेतीच करावी लागली, तिथे इतर उद्योग, हॉटेलं उभारता येणार नाही. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गोव्याचा आम्ही गुरुग्राम होऊ देणार नाही, थोडक्यात उत्तर भारतीयांना जमिनी घेऊन गोव्याची वाट लावू देणार नाही आणि हे बोलणारा कोण तर भाजपचा मुख्यमंत्री.
महाराष्ट्र सैनिकांना आवाहन करतांना राज म्हणाले, पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेळेत व्हावे यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा. सर्वसामान्य लोकांना त्रास होईल असं आंदोलन नको, पण आंदोलन असं करा कि सरकारला धडकी भरली पाहिजे. या आंदोलनानंतरही महाराष्ट्र सैनिकांनी जागृत राहावं. कोकणी माणसांच्या जमिनी कोणीही बळकावू नये हे पहावं. कोकणात उद्योग आलेच पाहिजेत, पण ते कोकणच्या निसर्गाची हानी करून नाही. निसर्गाने कोकणाच्या रूपाने जे अद्भुत दान महाराष्ट्राच्या पदरात टाकलं आहे, त्याचं संवर्धन करूया, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.