अलिबाग
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची आज अलिबागमध्ये जमीन परिषद पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी जमीन अधिग्रहणाच्या गंभीर मुद्द्यावर लोकांशी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी राज्य सरकारवर जहरी टीका केली.
राज्यातील जमिनी परप्रांतीयांच्या हातात जाऊ नये म्हणून राज ठाकरेंनी अलिबागमध्ये जमीन परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी जमीन विकू नका असं आवाहन केलं. दुबईसारख्या देशांमध्ये परदेशातील व्यक्तीला व्यवसाय सुरू करावयाचा असल्यास तेथील स्थानिकासोबत पार्टनरशिप करावी लागते. तुम्हीही अशाप्रकारे पार्टशिपची मागणी का करीत नाही…हा एक पर्याय आहे. मात्र आपल्या जमिनी व्यावसायिकांच्या घशात जाऊ देऊ नका.
यातून तुम्ही तुमच्याच गावी स्थिर स्थावन राहाल आणि मुलांचं भवितव्यही सुरक्षित राहील. आपल्या हातून सगळं निघून गेलं, घर का ना घाट का राहिलो अशी परिस्थिती निर्माण होईल. महाराष्ट्रातील सर्व उत्तम गोष्टी लुबाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पैसे देऊन बलात्कार सुरू आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.