मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला पाठींबा दिलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांची तोफ उद्या पुण्यात (pune )धडाडणार आहे .भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारार्थ त्यांची उद्या पुण्यातील सारसबाग परिसरात सायंकाळी 6 वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. या आधी त्यांच्या सभेच्या नियोजनासाठी मनसे कार्यालयात भाजप आणि मनसेच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांच्या सभेचं योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येणार आहे. आता या सभेत ते कोणावर निशाणा साधणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .
या लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोहोळ यांच्या प्रचारात एकदिलाने उतरले आहेत. ही सभा यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व जण काम करत आहोत. सभेला चांगली गर्दी होईल असा विश्वास आहे. सभास्थानी प्रत्यक्ष जाऊन पाहाणी केली आणि आढावा घेतला. वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी प्रयत्न करीत आहोत.अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे . दरम्यान मनसेला मानणारा मोठा मतदार पुणे लोकसभा मतदारसंघात आहे . दरम्यान येत्या 17 मेला महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडून होणार शक्तिप्रदर्शन आणि प्रचाराच्या सांगता सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन्ही पक्षाकडून शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला आहे मात्र परवानगी संदर्भात महापालिकेकडून अद्याप कुठलाही निर्णय नाही.आता या शिवाजी पार्कवर आवाज कोणाचा घुमणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
मुंबईतील शिवाजी पार्क मैदानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वात आधी अर्ज केला आहे . मात्र मैदान न मिळाल्यास बीकेसीतील मैदानाचा दोन्ही पक्षांकडे पर्याय उपलब्ध आहे मात्र शिवाजी पार्क मैदानासाठी दोन्ही पक्षाकडून आग्रह केला जात आहे. 17 मे च्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदान कोणाला मिळणार ? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहचली आहे .