नाशिक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजचा नाशिक दौरा अनेकार्थाने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पक्षांतर्गत कोल्डवॉरमुळे मनसेची महानगरपालिकेतील सत्ता आणि शहरातील ३ आमदार गेले. नाशिकमधील पक्षांतर्गत मतभेदामुळे राज ठाकरेंना मोठा फटका सहन करावा लागत आहे.
राज ठाकरे ४ फेब्रुवारीपर्यंत नाशिकमध्ये तळ ठोकणार आहे. यादरम्यान ते मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहे. आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्यासाठी आणि रणनीती ठरवण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे.
एकेकाळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र पदाधिकाऱ्यांमधील कलहामुळे पक्षाला मोठा फटका सहन करावा लागला. गेल्या काही काळात मनसेमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजप किंवा इतर पक्षांसोबत जाणं पसंत केलं. नाशिकमधील पक्षाची मोट बांधण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. दिलीप दातीर यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली, मात्र अचानक वैयक्तिक कारण सांगत त्यांनी पक्षप्रमुखांकडे पदमुक्त करण्याची विनवणी केली. पुढे ही जबाबदारी सुदाम कोंबडे यांच्यावर सोपवण्यात आली. संघटना मजबूत करण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांमधील संबंध चांगले राहावे यासाठी अमित ठाकरे वारंवार नाशिकचा दौरा करीत होते. मात्र प्रत्यक्षात फारसा फरक पडला नसल्याचं सांगितलं जात आहे.