X: @therajkaran
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षातील १३७ पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटात प्रवेश केला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत लोणावळ्यात (Lonavala) हा पक्ष प्रवेश झाला. त्यामुळे पवार गटाची ताकद वाढणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना बहाल केले. पण आमच्या पक्षाचे मालक शरद पवारच आहेत, हे दाखवण्यासाठी लोणावळ्यात “वेळ पण तीच, मालक पण तोच” ही नवीन टॅग लाईन आज समोर आणण्यात आली. लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली. सोबत प्रतिभा पवारही होत्या. क्रेनवर मोठा हार लावण्यात आला होता. ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.
राष्ट्रवादीमध्ये (NCP) फूट पडल्यापासून अनेक नेते, कार्यकर्त्यांनी शरद पवार गट सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजित पवार गटाने अनेक जिल्ह्यात सभा घेत पक्षबांधणीला सुरूवात केली. तर दुसरीकडे शरद पवार गट नव्याने पक्ष उभारणी करत आहे. मागील काही दिवसात अजित पवार यांच्या पक्षाच्या मावळमधील (Maval) आणि पुणे (Pune) जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील नाराजीने राजीनामा दिला, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तरीही राजीनामा देणारे आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
दरम्यान, येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागा वाटपाच्या चर्चेत असताना अजित पवार यांना आज एक मोठा झटका बसला आहे.
Also Read: राष्ट्रवादीचा अजितदादा गट विधानसभा निवडणूक अरुणाचल प्रदेशातुन लढण्यास सज्ज