Twitter : @NalavadeAnant
मुंबई
नारीशक्ती वंदन अधिनियम – २०२३ (Nari Shakti Vandan Adhiniyam) संदर्भात लोकसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून शिवसेनेचा व्हीप डावलणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे (Shiv Sena MP Rahul Shewale) यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्या विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव या चार खासदारांचे निलंबन करण्याबाबतही आम्ही कायदेशीर सल्ला घेत असून याबाबत लोकसभा अध्यक्षांना देखील निवेदन देणार असल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केले.
खा. शेवाळे म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसप्रणीत आघाडीतील सर्व खासदारांनी महिला आरक्षण विधेयकाला समर्थन दिल्याचे जाहीर केले होते. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. त्यांच्या आघाडीतील अनेक खासदार या विधेयकाच्या मतदानादरम्यान अनुपस्थित होते. लोकसभेत शिवसेना पक्षाचे प्रतोद पद खासदार भावना गवळी (Whip Bhavana Gawali) यांच्याकडे असून त्यांनी जारी केलेला व्हीप शिवसेनेच्या सर्व खासदारांना बंधनकारक आहे.
शेवाळे म्हणाले, त्यानुसार त्यांनी १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनाला (Special Session of Parliament) उपस्थित राहण्यासाठी खासदार गवळी यांनी पक्षाच्या वतीने सर्व खासदारांना व्हीप जारी केला होता. मात्र उबाठा गटाला समर्थन करणाऱ्या चार खासदारांनी या व्हीपचे उल्लंघन केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी नेहमीच महिला आरक्षणाच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. पण त्यांच्या विचारांचा वारसा सांगणारे हे चार खासदार महिला आरक्षण विधेयका विषयी मतदानाच्या वेळी सभागृहात उपस्थित नव्हते, ही लाजिरवाणी आणि दुर्दैवी घटना असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
खासदार ओमराजे निंबाळकर दिल्लीमध्ये असूनही ते सभागृहात आले नाहीत. महिलांचा अवमान करणाऱ्या या खासदारांना जनताच त्यांची जागा दाखवून देईल. तसेच अनेक वर्षे प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक सभागृहात मांडण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखविल्याबद्दल खासदार शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभारही मानले.