नवी दिल्ली : केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील रेल्वे प्रशासनात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वायकर यांनी जोगेश्वरी येथे नव्याने सुरू होणाऱ्या टर्मिनससाठी मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यासोबतच पार्किंग, हॉटेल्स, मॉल्स आणि स्वच्छतेच्या सुविधा सुधारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोकण रेल्वेच्या ३७० किमी लांबीच्या दुपदरीकरणासाठी लवकरात लवकर बैठक घेण्यात यावी आणि काम सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर रेल्वे मंत्री वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
गोवा आणि महाराष्ट्र सरकारने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यास सहमती दर्शवली असून, यास रेल्वे मंत्री यांनी तत्वतः मान्यता दिली असल्याचे वायकर यांनी सांगितले.
कोकण रेल्वे मार्गावरील जुन्या भुयारी मार्गांचे आणि पुलांचे वेळोवेळी सर्वेक्षण करून आवश्यक त्या दुरुस्ती कराव्यात, अशी मागणीही वायकर यांनी केली.
या सर्व मागण्यांवर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे खासदार रविंद्र वायकर यांनी स्पष्ट केले.