मुंबई ताज्या बातम्या

मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे आगार : विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

X: @NalavadeAnant

मुंबई: मुंबई महानगरपालिका (BMC) भ्रष्टाचाराचे आगार बनले आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई साफ करण्याचा उद्योग सुरू केला आहे. निविदा प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करुन रस्ते विकासाच्या निविदा अंतिम केल्याचे ७०० कोटींच्या घोटाळ्याचे प्रकरण आता समोर आले असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सरकारने शोधला पाहिजे, अन्यथा जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचा हा उद्योग सरकारच्या आशिर्वादाने सुरूच राहणार,असा जोरदार हल्लाबोल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराला गुरूवारी पुन्हा एकदा तातडीची पत्रकार परिषद घेत वाचा फोडली. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून ही रस्ते विकास निविदा प्रक्रिया थांबवण्याची मागणीही वडेट्टीवार यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.

वडेट्टीवार म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाने ७०० कोटी रुपयांचे कंत्राट निविदा प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करुन अंतिम केले आहे. एम. एम.आर.डी.ए.ने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग महानगरपालिकेकडे हस्तांतरित केल्यानंतर दोन्ही महामार्गावरील प्रवेश नियंत्रण प्रकल्पांतर्गत पूर्व द्रुतगती महामार्गवर एक जंक्शन आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर तीन जंक्शन यांची सुधारणा करण्याच्या कामासाठी महापालिकेने तातडीने निविदा मागवल्या होत्या. त्यावेळी प्राप्त निविदा २८ फेब्रुवारी, २०२४ ला उघडण्यात आल्या. या निविदेत प्रशासकीय अंदाजित दराच्या तुलनेत सात टक्के अधिक दराने सुमारे ७५८ कोटी रुपयांमध्ये बोली लावणाऱ्‍या आर.पी.एस.इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीला पात्र ठरवण्यात आले. निविदा २८ फेब्रुवारीला उघडण्यात आल्यानंतर लेखा (वित्त) विभाग आणि उपायुक्त (पायाभूत सेवा) यांनी मंजुरी देण्याचे काम एका दिवसात पार पाडले.  त्यानंतर २९ फेब्रुवारीला रस्ते विभागाने अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्या स्वाक्षरीने आयुक्तांच्या मंजुरीला हा प्रस्ताव पाठवला. आता कार्यादेश बजावण्याची कार्यवाहीही रस्ते विभागाकडून तात्काळ होणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील निविदा अंतिम करण्याबाबतच्या कार्यवाहीचा इतिहास बघितला तर प्रशासकीय मंजुरीचा मसुदा बनवायला काही महिने लागतात. या प्रकरणात मात्र निविदा उघडल्यानंतर एका दिवसात दोन विभागांनी छाननी करुन अंतिम प्रस्‍ताव आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठविण्याची केलेली कार्यवाही संशयास्पद असल्याचा थेट आरोपही वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

वडेट्टीवार म्हणाले की, लोकसभेची आचारसंहिता (Lok Sabha election) येत्या काही दिवसात लागणार आहे. महापालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूकीच्या कामासाठी पाठविण्यात येणार असून अशा परिस्थितीत एवढ्या जलदगतीने कार्यवाही करणे संयुक्तिक नव्हते. आयुक्तांनी अर्थसंकल्पात या कामाबाबतचा उल्लेख केला होता. त्यानंतर काही महिन्यांचा काळ गेला. ही कार्यवाही या काळात महापालिकेला करता आली असती. मात्र एवढा काळ वाया घालवून नियम धाब्यावर बसवून ७०० कोटी रुपयांच्या मोठ्या कामाची निविदा अंतिम करण्याची कार्यवाही महापालिकेकडून केली गेली असून ही अतिशय गंभीर व संशयास्पद बाब आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करण्याबाबतचे आदेश देऊन वर्क ऑर्डर देण्याची कार्यवाही थांबवावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज