मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येणार आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी (Prime Minister) विराजमान होणार आहेत. त्यांच्या या शपथविधीची (Swearing Ceremony) तारीखही ठरली असून 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता मोदी पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत , अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली आहे .
या लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीने 294 जागांवर विजय मिळाला असून, त्यापैकी एकट्या भाजपने 240 जागांवर विजय मिळवला आहे. तर इंडिया आघाडी 232 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये एकट्या काँग्रेसनं 99 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र या निवडणुकीत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला धक्का बसला असून 2019 च्या तुलनेत येथे भाजपच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे . या राज्यांमध्ये इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असलेले पक्ष आघाडीवर आहेत. दरम्यान एनडीएने सत्तास्थापनेचा दावा केला असला तरी हे सरकार चालवताना नरेंद्र मोदींच्या नाकीनऊ येतील, असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे .
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मंत्रिमंडळ स्थापनेच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठर पार पडली. एनडीएच्या खासदार, मुख्यमंर्त्यांसह युतीचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींना समर्थन असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा प्रस्ताव १४० कोटी जनतेच्या मनातील आहे, अशा भावना अमित शाहंनी व्यक्त केल्या आहेत. संसदीय पक्षाच्या नेतेपदी मोदींची निवड झाली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी नरेंद्र मोदींना मिळाली आहे.