नवी दिल्ली – 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप तालकटोरा स्टेडियम येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. या संमेलनातून मराठी भाषेचा संवर्धनाचा वसा घेऊन जावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
समारोप सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, संमेलनाध्यक्षा ताराबाई भवाळकर, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विजय दर्डा, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषाताई तांबे, राजीव खांडेकर, आणि साहित्य, पत्रकारिता व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, “दिल्लीतील मराठ्यांच्या ऐतिहासिक उपस्थितीचा हा सोहळा आहे. याच ठिकाणी 1737 साली मराठ्यांची छावणी होती, आज ती साहित्यिक रूपात उभी आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यात माझाही वाटा होता, याचा अभिमान वाटतो.”
संजय नहार यांच्या ‘सरहद्द’ संस्थेने दिलेल्या महादजी शिंदे पुरस्कारावर वाद निर्माण करणाऱ्यांचा तिरस्कार हाच माझ्यासाठी खरा पुरस्कार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “राजकारण निवडणुकीपुरते असते, त्यानंतर संबंध टिकवणे हाच महाराष्ट्रधर्म आहे,” असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांच्यातील सौहार्दपूर्ण संवादाचे उदाहरण दिले.
मराठीच्या संवर्धनासाठी शासकीय कार्यालयांबरोबरच सार्वजनिक ठिकाणी मराठीचा वापर वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, दिल्लीतील JNU मध्ये मराठी अध्यासन केंद्र, शिवसृष्टी स्थापन करणे आणि शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली.
शिंदे म्हणाले, “मराठी ही संतांची, वीरांची आणि अभिमानाने मिरवण्याची भाषा आहे. तिच्या जतनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा,” असे आवाहन त्यांनी केले. संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल साहित्य मंडळ आणि संयोजकांचे त्यांनी आभार मानले. 100 व्या साहित्य संमेलनाच्या तयारीला आतापासूनच सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले.