छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप –
दिल्ली: दिल्लीसारख्या राजकीय केंद्रस्थानी महाराष्ट्राने आपल्या माणसाला यशस्वी होऊ द्यायचे ठरवले पाहिजे. एखाद्या नेत्याला पुढे चाल दिली पाहिजे. केवळ संगीत खुर्चीचा खेळ नसावा. पुढे येणाऱ्या नेत्यांनी पाच ते दहा वर्षे येथे राहण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि येथील दरबारी राजकारण व प्रवृत्ती समजून टिकाव धरला पाहिजे. सही केली की विमानाने मतदारसंघात जाण्याची सवय बदलली पाहिजे, असे स्पष्ट विचार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
ते आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ९८व्या सत्रात “असे घडलो आम्ही” या प्रकट मुलाखतीत बोलत होते. पत्रकार राजीव खांडेकर आणि प्रविण बर्दापूरकर यांनी त्यांना संवादासाठी बोलतं केलं. या मुलाखतीत महाराष्ट्र ते दिल्ली आणि मुख्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा जीवनपट उलगडत गेला.
पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, त्यांचे आई-वडील मध्यममार्गी डाव्या विचारांचे होते. त्यांचे शालेय शिक्षण कराड व नवी दिल्ली येथे झाले, तर उच्च शिक्षण अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात पूर्ण झाले. त्यावेळी तेथे बारा नोबेल पारितोषिक विजेते प्राध्यापक होते. भारतात संगणक प्रणाली नवी असताना देवनागरी लिपी उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी आपल्या कंपनीतून केले.
त्यांना राजीव गांधींनी दिल्लीत संधी दिली. पंतप्रधान नरसिंहराव आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्यासोबत आर्थिक सुधारणा घडवताना त्यांचा सहभाग राहिला. पुढे पंतप्रधान डॉ. सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राज्य सरकारांमध्ये समन्वय राखण्याचे कार्य केले.
चव्हाण यांनी सांगितले की, २००४ साली तामिळ भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्रानेही २०१० पासून प्रयत्न सुरू केले. २०११ साली समिती स्थापन करण्यात आली. २०१३ मध्ये ४३५ पानांचा अभ्यासपूर्ण अहवाल केंद्रीय मंत्री शैलजा यांना सादर केला. याचे फलित अखेर २०२४ साली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यात झाले, असे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील राजकीय वातावरणाबाबत मिश्किल आणि मार्मिक उत्तर देताना चव्हाण म्हणाले, “येथे उगवत्या सूर्याला नमस्कार ही स्थिती आहे.” उत्तरेकडील राज्यांचे प्रमुख नेते दिल्लीत सातत्याने राहतात, मात्र महाराष्ट्रात “प्रत्येक लग्नाला खासदाराने हजर राहिलेच पाहिजे” ही मानसिकता आहे.
पुढे एक आठवण सांगताना त्यांनी नमूद केले की, “आम्ही पंचवीस खासदार एका दैनिकाच्या निमंत्रणावरून लाहोरला गेलो. मात्र, त्यानंतर मतदारसंघात आमच्याविरुद्ध ‘मतं पाकिस्तानकडूनच मागा’ असा प्रचार सुरू झाला.” अशा परिस्थितीत महाराष्ट्राने दिल्लीतील राजकारण समजून घेत, टिकाव धरून पुढे जाण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.