कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी(Kolhapur Loksabha ) महाविकास आघाडीकडून रिंगणात असलेले श्रीमंत छत्रपती शाहू महाराज(Shahu Maharaja )यांच्याविरोधात उमेदवारी कोणाला दिली जाणार ? याबाबत अजूनही संभ्रम आहे. विद्यमान शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक(Sanjay Mandlik)यांना उमेदवारी दिली जाणार की नाही याबाबत अजून चर्चा सुरूच आहे. तर दुसरीकडे हातकणंगले मतदारसंघात खासदार धैर्यशील माने(Dhairyasheel Sambhajirao Mane) यांचा पत्ता कट होण्याच्या चर्चा सुरु असताना त्यांनी उमेदवारीवरून विश्वास व्यक्त केला आहे. काहीही झालं तरी दोघांनी सुद्धा उमेदवारी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आज उमेदवारीवरून बोलताना संजय मंडलिक यांनी सांगितले की ,मला सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी फोन करून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील नागरिकांनी कुठलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असेही त्यांनी यावेळी सांगितलं. महायुतीची उमेदवार मलाच मिळणार असा विश्वासही संजय मंडलिक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी उमेदवारीवरून बोलताना म्हणाले की, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून माझं तिकीट कापले जाणार ही केवळ अफवा असून तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होत असल्याने उमेदवारी घोषित करण्यासाठी थोडा उशीर होत आहे. मात्र, पुढील काही तासांमध्ये उमेदवारी घोषित केली जाईल असा विश्वास माने यांनी व्यक्त केला.
दरम्यान याअगोदर ‘राजर्षी शाहू महाराज यांच्या समतेचा, सर्व घटकांना मुख्य प्रवाहित सामील करुन विकासात्मक वाटचालीचा आणि कोल्हापूरच्या सर्वंकष उन्नतीचा विचार दिल्लीपर्यंत पोहोच करण्यासाठी आपण लोकसभेच्या मैदानात उतरत आहोत. जनतेने प्रचंड आग्रह धरल्यानेच हा निर्णय घेतला आहे. आपली उमेदवारी म्हणजे कोल्हापूरच्या जनतेच्या स्वाभिमानाची लढाई आहे. त्यामुळे ही लढाई जिंकण्यासाठी त्यांचाच पुढाकार असेल’, अशी भावना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केली.इंडिया आघाडी व महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमंत शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित झाली. ते काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार मित्र पक्षांची पसंती त्यांच्या उमेदवारीला मिळाली आहे.