नागपूर
वंचित बहुजन आघाडी ही इंडिया आघाडीत येण्याबाबत शरद पवार सकारात्मक असल्याचं दिसून येत आहे. काल 27 डिसेंबर रोजी अमरावती येथे शरद पवार माध्यमाशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, इंडिया आघाडीच्या बैठकीत मी मल्लिकार्जुन खरगे यांना प्रकाश आंबेडकरांशी संपर्क साधून त्यांच्यासह निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करायला हवं, असं सांगितलं आहे.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसकडून कोणताही निरोप आला नसल्याची माहिती समोर आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचं पत्रक…
आम्हाला शरद पवार यांनी अमरावती येथे प्रसारमाध्यमांसमोर केलेल्या विधानाची माहिती मिळाली, ज्यात त्यांनी म्हटले होते की, मल्लिकार्जुन खर्गे यांना वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकाला उत्तर देण्याची आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडी (MVA) आणि Indian National Developmental Inclusive Alliance (I.N.D.I.A) चे निमंत्रण देण्याची विनंती त्यांनी दिल्लीत केली होती. 19 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या चौथ्या I.N.D.I.A बैठकीत शरद पवार यांनी घेतलेल्या पुढाकाराचे आम्ही कौतुक करतो.
अद्याप आम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) दिल्लीतील मुख्यालय किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयाकडून कोणतेही पत्र किंवा कॉल किंवा कोणत्याही प्रकारचा संवाद प्राप्त झालेला नाही. तथापि, आम्ही सकारात्मक आहोत आणि MVA आणि I.N.D.I.A या दोन्हीमध्ये आमंत्रित करण्यासाठी INC कडून प्रतिसादाची वाट पाहत आहोत, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी दिली आहे.