मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर (मनसे) संभाव्य युतीबाबत सुरू झालेल्या चर्चांवर अखेर काँग्रेसने अधिकृत खुलासा केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, “मनसेसोबत युती किंवा आघाडीबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. नाशिकमधील आजच्या बैठकीत काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून जे लोक गेले होते, त्यांना पक्षाने अधिकृतपणे पाठवले नव्हते. त्यांच्या उपस्थितीशी पक्षाचा कोणताही संबंध नाही. त्या व्यक्तींना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.”
सपकाळ म्हणाले की, राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आतापर्यंत सुमारे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांची छाननी सध्या सुरू आहे.
“१२ नोव्हेंबर रोजी राज्य पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होणार असून, त्यात उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल,”
असेही त्यांनी नमूद केले.
मुंबई महापालिका निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर सपकाळ म्हणाले, “मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढावी, अशी अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. तथापि, निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. ती जाहीर झाल्यानंतरच त्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल.”
मोहन भागवतांना कोणी गांभीर्याने घेत नाही’
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानांवर भाष्य करताना सपकाळ म्हणाले, “मोहन भागवत हे पूर्णतः कन्फ्यूज झाले आहेत. त्यांची विधाने सातत्याने बदलतात. समाजातील अस्पृश्यता, स्त्री-पुरुष समानता यावर ते कधीच बोलत नाहीत; ते नेहमीच विशिष्ट वर्गाच्या मक्तेदारीबाबत बोलतात. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.”
ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भागवतांचे ऐकले नाही. ७५ वर्षांनंतर निवृत्ती घ्या असा आदेश दिला, तरी मोदींनी त्याला केराची टोपली दाखवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अजित पवारांना सत्तेत घेऊ नका असे सांगण्यात आले होते, पण त्यांनीही ऐकले नाही. जेव्हा त्यांच्या स्वतःच्या संघपरिवारात त्यांचे आदेश पाळले जात नाहीत, तेव्हा देशातील लोक त्यांना काय मान देतील?”

