नागपूर: पश्चिम किनारपट्टीवर कोकणातील मच्छिमारांना परराज्यातील आणि आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडून येणाऱ्या मोठ्या बोटी आणि ट्रॉलर्सकडून होत असलेल्या मासेमारीमुळे नुकसान होत आहे. तसेच स्थानिक मच्छिमारांवर समुद्रात होणारे हल्ले गंभीर बाब आहे आणि त्याची दखल घेतली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले.
विधानसभेत औचित्याच्या मुद्यावर बोलताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथमच निवडून आलेले शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी कोकणातील मच्छिमारांचा प्रश्न उचलून धरला. त्यांनी कर्नाटक आणि अन्य राज्यांमधील मच्छिमार ट्रॉलर्स अत्याधुनिक बोटींच्या साहाय्याने कोकण किनारपट्टीजवळ मोठ्या प्रमाणावर मासेमारी करत असल्याकडे लक्ष वेधले. त्यामुळे कोकणातील स्थानिक मच्छिमारांची जाळी तुटून मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
“काही ट्रॉलर्स आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडूनही येतात. समुद्रात कोणत्याही प्रकारची दक्षता, सुरक्षा किंवा प्रतिबंधक व्यवस्था का नाही?” असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला. याशिवाय, बाहेरील मच्छिमार स्थानिक मच्छिमारांवर हल्ले करत त्यांना जखमी करत असल्याचीही गंभीर बाब त्यांनी मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी विनंती राणे यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी औचित्याच्या मुद्यावर मंत्र्यांनी उत्तर देण्याची परंपरा नसल्याचे सांगितले. मात्र, मुद्दा अत्यंत गंभीर असल्याचे मान्य करत त्याची नोंद घेत असल्याचे त्यांनी सभागृहात जाहीर केले.