पक्षाच्या खासदार आमदारांची बोलावली बैठक
मुंबई : राजापूर येथील उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कधीकाळी कट्टर समर्थक मानले गेलेले पराभूत उमेदवार राजन साळवी यांनी उध्दव ठाकरेंना शेवटचा जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांच्या उपस्थितीत एका जंगी कार्यक्रमात प्रवेश केल्याने भानावर आलेले उध्दव ठाकरे आता खडबडीत जागे झाले असून ते आता पक्षातल्या या डॅमेज कंट्रोलला सावरण्यासाठी सरसावले आहेत.
या पार्श्वभूमीवर त्यांनी आता येत्या २० फेब्रुवारीला खासदारांची आणि २५ फेब्रुवारीला आमदारांची बैठक मातोश्री निवासस्थानी बोलावली असून या बैठकीत पक्षातील कमकुवत बाबींचा आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गटनेते पदाबाबत चर्चा केली जाणार असल्याचे ठाकरे गटातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
शिवसेनेतील एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्याने उद्धव ठाकरे यांचे टेंशन जबरदस्त वाढले असून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे की त्यांचे काही खासदार देखील पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत. या संभाव्य पक्ष सोडणाऱ्या खासदार -आमदारांची अशीही एक भावना आहे की, आता केंद्रातील मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आता भक्कम स्थितित आहे. तर राज्यातील भाजप प्रणित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनेही सत्तेवरची आपली पकड मजबूत बसवली आहे. त्यात आगामी पाच वर्षात जर आपल्याला आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर साहजिकच निधीची आवश्यकता लागणार आहे. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांची अडलेली कामेही करणे गरजेचे आहे. अशात जर उध्दव ठाकरे हेच जर आपल्याला विचारत नसतील तर सरळ एकतर भाजपत जावे किंवा थेट राजन साळवी यांच्या सारखा ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जावे. मात्र याची कुणकुण उध्दव ठाकरेंना लागल्याने त्यांनी तातडीने या सर्वांची विशेष बैठक बोलावली आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात आधीच उध्दव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. कारण अगदी पालघरपासून ते थेट सिंधुदुर्ग अशा तब्बल पाच मोठ्या जिल्ह्यातून या विधानसभा निवडणुकीत पूर्ण नामशेष झाला आहे. इतके कमी म्हणून की काय, शिवसेनेच्या हक्काच्या मुंबईतही आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकी पर्यंत पक्ष राहणार की नाही अशी परिस्थिती आता उभी ठाकल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
एकेकाळी शिवसेनेची रणरागिनी व मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांनीही पक्षातील काही नेत्यांच्या जाचाला कंटाळून अखेर पक्षच सोडला. या पार्श्वभूमीवर मिशन टायगर राबवून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उध्दव ठाकरे यांचा पक्षच मुंबईतून खालसा करण्यासाठीच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामूळे आता आगामी काळात ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक हेही लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा केला जात आहे.
त्यामुळेच या गळतीला तोंड देण्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कारण येत्या काही दिवसांत कोकणातील ठाकरे यांच्या शिवसेनेचे एकमेव निष्ठावंत आमदार भास्कर जाधव यांनाही गळाला लावण्याच्या हालचाली सुरू असल्याचे दिसून येत असून आता पक्ष सोडणार असलेल्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांकडून वाढलेली गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी खासदार व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये, पक्षात नेमकं काय सुरु आहे आणि खासदार व आमदारांच्या मनातील विचार काय आहेत, याचीही सखोल चर्चा पहिल्यांदाच केली जाईल.
मातोश्रीवर दररोज बैठका आयोजित करण्यात येतात, ज्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जातो. यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असते. येत्या २० आणि २५ फेब्रुवारीला देखील अशाच प्रकारच्या बैठकांचा आयोजन होणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दिली. दरम्यान ठाकरे गटाचे आणखी एक निष्ठावंत माजी आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. मात्र नाईक यांनी शिवसेना सोडण्याचा विचार असलेला काहीही इशारा नाकारला असून त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “आंगणेवाडी यात्रेच्या निमंत्रणासाठी ही भेट घेतली. शिवसेना सोडण्याचा विचार नाही. आता पराभव झाला असला तरी थोडं थांबू आणि पुन्हा लढून नव्याने साम्राज्य निर्माण करू.” असे जरी म्हटले असले तरी याच जत्रेदरम्यान आणखी एक मोठा फटका फुटणार असल्याचे या सूत्रांनी अगदी ठासून सांगितले.