मुंबई: मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तब्बल २१२१ रस्त्यांपैकी केवळ ४७९ रस्त्यांचेच काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित १६०० हून अधिक रस्त्यांचे काम अद्याप अर्धवट अवस्थेतच आहे. संपूर्ण मुंबई शहर हे सध्या खोदकाम, धूळ आणि वाहतूक कोंडीत अडकलेले असताना, आता पावसाळ्याच्या उंबरठ्यावर चिखलात बुडण्याची भीती निर्माण झाली आहे.
महापालिका आयुक्तांनी फेब्रुवारीमध्ये झालेल्या आढावा बैठकीत ३१ मे २०२५ पर्यंत सर्व काँक्रिटीकरण कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रत्यक्षात या आदेशाकडे दुर्लक्षच झाले असून कामाचा गतीमान वेग दिसून येत नाही.
सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने कोणतीही लोकप्रतिनिधींची जबाबदारी नाही. हीच संधी साधत कंत्राटदार, अधिकारी आणि दलाल यांचे सिंडिकेट सक्रिय झाले आहे, अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे. निधीचं वाटप झालंय, पण प्रत्यक्षात काम मात्र ठप्प असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“आयुक्तांच्या स्पष्ट आदेशांनंतरही कामे रखडवणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होणार की नेहमीप्रमाणे ‘स्मशान शांतता’ राखली जाणार?” – असा थेट सवाल ॲड. मातेले यांनी उपस्थित केला आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत, रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकतात, आणि शाळकरी मुलं चिखलात पडतात. “ही कोणती मुंबई आहे? शांघाय होणारी की शमशान बनलेली?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस लवकरच महापालिका आयुक्तांना निवेदन देणार असून, परिस्थितीत सुधारणा न झाल्यास अनोख्या मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला.
“मुंबईकरांच्या प्रश्नांवर आवाज उठवणं ही आमची जबाबदारी आहे, आणि ती आम्ही निभावणारच!” – ॲड. अमोल मातेले, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट), मुंबई.