शेतकरी आत्महत्येवरून विरोधी पक्षनेत्यांचा राज्य सरकारवर निशाणा…?
Twitter: @NalavadeAnant
मुंबई: राज्यात जून-जुलै महिन्यांमध्ये समाधानकारक पडलेल्या पावसानं मराठवाड्यात तब्बल ४४ दिवस ओढ दिलेली असून परिणामी शेतकऱ्यांची पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र स्वत:मध्ये मश्गूल असलेल्या सरकारला शेतकरी बांधव त्याच्या जीवनातल्या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जात आहे याची साधी जाणीवही नाही. त्यामुळे तिजोरी लुटणाऱ्या सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
शेतकरी आत्महत्येसंदर्भात सरकारवर निशाणा साधत वडेट्टीवार म्हणाले की, एकीकडे मुख्यमंत्री राज्याला आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा करतात, मात्र राज्यात यंदा पावसाने दडी मारल्याने मराठावाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. संपूर्ण मराठवाडा आज दुष्काळाच्या छायेत आहे. तरीही सुस्त सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तिजोरी लुटणाऱ्या सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
कृषीमंत्री उत्तरसभा घेण्यात व्यस्त
शेतकरी आत्महत्येवरून धनंजय मुंडे यांचं नाव न घेता वडेट्टीवार यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला. कृषिमंत्र्याच्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक १८६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. मात्र कृषीमंत्री सध्या उत्तरसभा घेण्यात व्यस्त आहेत, अशी टिका करत महाराष्ट्रात जे काही राजकारण सुरु आहे त्यात लोकांना बिलकूल रस नाही. लोकांची कामं होणं गरजेचं आहे याकडेही वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले.
जातीय विष पेरण्याचे काम
ते म्हणाले, केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करीत नाही. मात्र उद्योगपतींचे कोटयावधी रुपयांचे कर्जमाफ केले जाते. केवळ धर्मांध वातावरण तयार करून जातीय विष पेरण्याचे काम सरकार करीत आहे. राज्यामध्ये विविध जिल्ह्यांत दंगली घडत आहेत. राज्यात गुन्हेगारीत देखील मोठी वाढ झाली. राज्य सरकार केवळ आमदारांना पोसण्याचे काम करीत असून सरकारी तिजोरी राजरोसपणे लुटली जात आहे. विकासाच्या नावावर मात्र कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे, असा आरोपदेखील वडेट्टीवार यांनी केला.
कामगारांना मदत करा
ठाण्यात बाळकुम परिसरात एका इमारत दुर्घटनेत ७ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यातच कामगारांच्या जीवाची काळजी घेतली जात नाही. मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खाते असताना आतापर्यंत विकासकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तात्काळ दाखल व्हायला हवा होता. मात्र मुख्यमंत्र्यांची मर्जी संपादित केलेला विकासक आहे म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा सवाल करत विकासकावर तातडीने सदोष मनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आणि कामगारांना दहा लाख रुपयांची मदत करण्याची मागणीही वडेट्टीवार यावेळी केली.
 
								 
                                 
                         
                            

