नागपूर
राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्था, मोठया प्रमाणात भ्रष्टाचारात झालेली वाढ आणि ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थे प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारचे वाभाडे काढले.
सरकार जनतेच्या मुळावर व शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले आहे. शेतकऱ्यांना विमा अनुदानाव्यतिरिक्त एकही रुपयाची मदत जाहीर केली नाही. विदर्भातील संत्री उत्पादक शेतकऱ्यांना कोणतंही पॅकेज दिलं नाही. हे सरकार भ्रष्टाचाराच्या गर्तेत सापडले असून राज्याला विकासा पासून दूर नेण्याचं प्रयत्न करणार हे सरकार शेतकरी विरोधी, मराठा समाजाला आरक्षण देण्यास असमर्थ ठरले असून हे सरकार कायदा व्यवस्थेचे भक्षक असल्याची टीकेची झोड उठवत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरले.
राज्यात संघटित गुन्हेगारीत झालेली वाढ, दिवसाढवळ्या होत असलेले खून, महिला अत्याचार, राज्यात मोठया प्रमाणात झालेल्या दंगलीच्या घटना या सर्व राज्याला भूषणावह नाही असे दानवे यांनी अंतिम आठवड्यावरील प्रस्तावावर भाष्य करताना म्हटले.
नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यास गृहमंत्री अपयशी
मागील ५ वर्षांपासून भाजपची सत्ता असतानाही आजही विदर्भाच्या प्रश्नांवर, विकासावर ठोस व कालबध्द कार्यक्रम सरकारने जाहीर केला नाही. गेले ५ वर्षे विदर्भाचा अनुशेष बाकी का आहे? विदर्भात मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. नागपुरमध्ये महिला अत्याचार, खून दरोडे या सारख्या गुन्ह्यात वाढ झाली असून येथील तरुण पिढी ही व्यसनाधीनतेकडे वळतेय. नागपूरचे पालकमंत्री हे गृहमंत्री असूनही त्यांच्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यास ते अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
सरकार हे टक्केवारी व भ्रष्टाचाराचे काम करत असून जनतेच्या हिताचे कोणतेही काम करत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला. मुंबई महानगर पालिकेत मोठया प्रमाणात सुरू असलेली लूट,रखडलेल्या पालिका निवडणुका, सिडकोने ६७ हजार घरांची विक्री करण्यासाठी खासगी संस्थेसाठी ६९९ कोटी रुपयांची काढलेली निविदा यावर दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
मुंबई प्रमाणे नागपूर, पुणे महानगरपालिकांची चौकशी करावी
मुंबई महानगरपालिके प्रमाणे नागपूर, पुणे महानगरपालिकांचीही चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. राज्यात मोठया प्रमाणात ड्रग्स कारखान्यांवर कारवाई झाली. ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी जेल अधीक्षकावरही कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.