मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि पर्यटन संचालनालयाद्वारे राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी 26 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत तीन दिवसीय महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महोत्सव पार पडणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
पर्यटन विभाग व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवाचा उद्देश पर्यटकांना महाबळेश्वर व परिसरातील प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला-संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणे आहे.
साहसी पर्यटन आणि संस्कृतीचा अनोखा संगम
या तीन दिवसीय महोत्सवात पर्यटकांसाठी विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:
• स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सव
• स्थानीय कला-संस्कृती आणि पाककृती महोत्सव
• घोडेस्वारी, ट्रेकिंग, रॉक क्लायम्बिंग, पॅराग्लायडिंग आणि जलक्रीडा
• महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार, कोयनानगर व तापोळा येथील पर्यटन स्थळांचे दर्शन
• स्थानीय बचत गटांचे हस्तकला प्रदर्शन व विक्री दालने
• पर्यटकांसाठी तंबू निवास व सुविधा
महाबळेश्वर आणि परिसरातील पर्यटन स्थळे
महाबळेश्वर हे समुद्रसपाटीपासून ४५०० फूट उंचीवर वसलेले असून, येथील हिरवाई, धबधबे आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा पर्यटकांना भुरळ घालतात. ब्रिटिश काळातील वास्तू, प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य दृश्ये आणि स्ट्रॉबेरी शेती यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
पर्यटन क्षेत्रातील भागधारकांसाठी विशेष उपक्रम
या महोत्सवात देशातील प्रमुख ट्रॅव्हल एजन्सी प्रतिनिधी, टूर ऑपरेटर्स आणि सोशल मीडिया प्रभावक यांना आमंत्रित करून परिचय सहली आणि परिसंवाद कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
महाबळेश्वर पर्यटन महोत्सव – एक परिपूर्ण अनुभव!
या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राच्या संभावनांना चालना मिळेल, असे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. साहसी पर्यटन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी हा महोत्सव एक उत्तम संधी ठरेल.