मुंबई : पालघर जिल्ह्यातील राज्य परिवहन सेवेतील बस व मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी पुढील दोन वर्षांत 200 नवीन एस.टी. बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी दिली.
परिवहन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालघर जिल्ह्यातील एस.टी. सेवेची स्थिती सुधारण्यासाठी विविध उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
आमदार विलास तरे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील विविध एस.टी. आगारांमध्ये बस आणि मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात कमतरताअसल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर 10 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देऊन तातडीची बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार 5 मार्च 2026 रोजी विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी टप्प्याटप्प्याने 200 नवीन एस.टी. बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
दोन टप्प्यांत बसेस उपलब्ध
निर्णयानुसार
- 2026–27 आर्थिक वर्षात 90 बसेस
- 2027–28 आर्थिक वर्षात 110 बसेस
अशा एकूण 200 बसेस पालघर जिल्ह्याला देण्यात येणार आहेत.
विविध आगारांना बसेस वाटप
या बसेस जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये आवश्यकतेनुसार वितरित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये
- पालघर – 10
- सफाळे – 10
- वसई – 15
- अर्नाळा – 15
- डहाणू – 05
- जव्हार – 15
- बोईसर – 10
- नालासोपारा – 10
यांचा समावेश आहे.
याशिवाय विभागीय कार्यशाळा आणि संबंधित आगारांमधील रिक्त पदे तीन महिन्यांच्या आत पूर्ण क्षमतेने भरण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी ‘गाव ते शाळा’ मोफत बस सेवा
यावेळी आमदार विलास तरे यांनी 21 फेब्रुवारी 2026 रोजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या “परीक्षेसाठी पिकअप वाहनातून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास” या बातमीकडे मंत्री सरनाईक यांचे लक्ष वेधले.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवास सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत ‘गाव ते शाळा’ मोफत बस सेवा सुरू करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
यावर सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘गाव ते शाळा’ मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या निर्णयांमुळे पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि नियमित सार्वजनिक वाहतूक सुविधा मिळेल, तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाही मोठा हातभार लागेल, असा विश्वास आमदार विलास तरे यांनी व्यक्त केला.

