X : @ ajaaysaroj
बहुजन विकास आघाडीने आज पालघर लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांशी तब्बल चार तास चर्चा केली. बविआ चे सर्वेसर्वा आमदार हितेंद्रअप्पा ठाकूर , बविआचे ज्येष्ठ नेते राजीव पाटील व आजीव पाटील यावेळी उपस्थित होते.
पालघर लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार म्हणून , माजी मंत्री ,जिल्हा परिषदेच्या सभापती मनीषाताई निमकर, माजी खासदार बळीराम जाधव , बोईसरचे विद्यमान आमदार राजेश पाटील, वाडा येथील माजी पंचायत समितीचे सभापती संतोष बुकले , जिल्हा परिषद सदस्य विष्णू कडव आणि पंचायत समितीचे माजी सदस्य पांडुरंग गोवारी यांनी आज बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर , ज्येष्ठ नेते राजीव पाटील व आजीव पाटील यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत पालघर मतदारसंघात येत असणाऱ्या , डहाणू , विक्रमगड , पालघर , नालासोपारा , बोईसर आणि वसई या सहा विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाची असणारी ताकद , तेथील नागरी समस्या , विरोधकांची स्ट्रॅटेजी यावर मुद्देसूद चर्चा झाली. डहाणू , पालघर व विक्रमगड या मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार आहेत , तर वसई , नालासोपारा व बोईसर येथे बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. महाविकास आघाडीने इथून भारतीताई कामडी यांना उमेदवारी दिली आहे , तर महायुतीने अजून आपला उमेदवार घोषित केलेला नाही.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बविआच्या बळीराम जाधव यांना ४,९१,५९६ इतकी घसघशीत मते मिळाली होती. एकूण मतदानाच्या ४७ टक्के मतं बविआने पटकावली होती हे इथे महत्त्वाचे आहे. भाजप शिवसेना युती एकत्र असताना राजेंद्र गावित जेमतेम २३,४०४ मतांनी इथून निवडून येऊ शकले होते. बविआची इथे हक्काची पाच लाखाच्या घरात मतं आहेत , इथून उमेदवार नक्की निवडून येऊ शकतो अशी खात्री आमदार हितेंद्र ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांना असल्याने , हा लोकसभा मतदारसंघ लढवायचाच असा निश्चय बविआने केला आहे. त्यामुळे इथून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या देखील जास्त आहे.
काही दिवसांतच उमेदवार जाहीर करण्यात येईल असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.