नवी दिल्ली
सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा अंतरिम अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी मांडण्यात आला आहे. दरम्यान, या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी सादर केलेली एक कविता मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.
यावेळी अमोल कोल्हेंनी आपल्या मतदारसंघातून प्रश्न संसदेसमोर मांडले. देशातील प्रत्येकाला भयमुक्त जगण्याचा अधिकार आहेशिरूर लोकसभा मतदारसंघात वारंवार होणारे बिबट्यांचे हल्ले हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे गावकऱ्यांच्या भीतीच्या वातावरणात जगावं लागत असल्याचं सांगत कोल्हेंनी या मुद्द्यावर सभागृहाचं लक्ष वेधलं. या ठिकाणी थ्री फेज वीज पुरवठा होत नसल्याने शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारात जावं लागतं. अशा परिस्थितीत बिबट्यांचे हल्ले वाढत आहे. यावर त्यांनी राज्य सरकारला एक प्रस्ताव पाठवल्याचंही सांगितलं. बिबट्यांचं प्रजनन नियंत्रण हा एकमेव पर्याय असल्याचं कोल्हेंनी यावेळी सांगितलं. पुढे ते म्हणाले, मागील ३५-४० दिवसांपासून कांदा निर्यातीवर बंदी आणल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे २ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगत या निर्यात बंदीमुळे पाकिस्तानी शेतकऱ्यांचे भले झाले याकडे लक्ष वेधून पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याच्या बाता करणाऱ्या केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याची टीका केली.
आपल्या भाषणाची सांगता करण्यापूर्वी त्यांनी राममंदिर निर्माणाचा उल्लेख करताना सर्वांचं अभिनंदन केलं. त्यानंतर सरकारवर आसूड ओढणारी एक कविताही सादर केली. ही कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.