मुंबई
पुण्यातील मोतीबागेत प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांच्या भेटीची चर्चा सुरू असताना इंडिया आघाडीत येण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
प्रकाश आंबेडकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याशिवाय काँग्रेस या प्रवेशाबाबत फारशी सकारात्मक नाही, असंच दिसून येतंय. त्यामुळे वंचितचा इंडिया आघाडीत कधी समावेश होणार, या चर्चांना अद्याप तरी पूर्णविराम मिळू शकलेला नाही.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
- सध्यातरी इंडिया आघाडीची दारं आमच्यासाठी बंद आहे. आम्हाला कधी प्रवेश द्यायचा हे त्यांनी ठरवायचंय. येथे इंडिया आघाडीच्या सहमतीचा प्रश्न आहे.
- इंडिया आघाडीत घेण्यास कोणाचा विरोध माहीत नाही.
- इंडिया आघाडीत आल्यानंतर आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशाला कसं पोकळ केलंय याच आराखडा मांडू.
- शरद पवारांसोबत भेटी होतच राहतील.
नेमकी अडचण कुठे?
शरद पवारांनी याआधीच प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत सकारात्मकदा दर्शवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट याबाबत सकारात्मक असल्याचं दिसून येतं. मात्र काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून प्रकाश आंबेडकरांवर टीका होत असल्याचं दिसत आहे.