X: @therajkaran
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमधील चर्चा अद्याप पूर्ण झाली नसल्याचे वंचितचे प्रकाश आंबेडकर वारंवार सांगत आहेत.
काल ४ मार्च रोजी जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकरांना समाज माध्यमातून एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल, यासाठी आपण प्रयत्न करूया, अशी विनंती केली होती. यावर प्रकाश आंबेडकरांनी उत्तर दिलं आहे.
तुम्ही भाजपबरोबर समझोता करणार नाही याबद्दल व्यक्तीगतरित्या खात्री आहे. परंतु, आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही. त्यामुळे भाजपसोबत जाणार नाही याची खात्री द्या, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आह. यापूर्वी आपल्या पक्षाने भाजपसोबत समझोता केलेला होता. त्यामुळे संविधान वाचविणे ही जी आपण व्यक्तिगत जबाबदारी घेतलेली आहे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. पण आपला पक्ष संविधान वाचविण्यासाठी पुढे येईल का? याबद्दल आमच्या मनात शंका आहे, असंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड, आपण लिहिलेले पत्र व्यक्तीगत आहे, राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहीलेले नाही असे आम्ही समजतो. आम्ही नेहमी मानत आलो आहोत की पक्षाची असो की व्यक्तीगत, राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे. तुम्ही भाजपबरोबर समझोता करणार नाही याबद्दल व्यक्तीगतरित्या खात्री आहे. परंतु, आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही. कारण या अगोदर आपल्या पक्षाने भाजपसोबत समझोता केलेला होता.
त्यामुळे संविधान वाचविणे ही जी आपण व्यक्तीगत जबाबदारी घेतलेली आहे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. पण आपला पक्ष संविधान वाचविण्यासाठी पुढे येईल का? याबद्दल आमच्या मनात शंका आहे.
आपल्या परीने आम्हाला संविधान वाचविण्यासाठी जे आणि जेवढे करणे शक्य आहे, तेवढे आम्ही संविधान वाचविण्यासाठी करत राहणार आहोत. त्यामुळे पत्राद्वारे आपण व्यक्तीगत संदेश पाठवला असला तरी त्यातून एक सूर दिसत आहे की, आम्ही संविधान वाचवायला निघालेलो नाही. या पत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हे सांगतो आहोत की, आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्यावेळी आमच्यातर्फे जेव्हा सांगण्यात आले की, आपल्याला मतदारांना हे आश्वासित करावे लागेल की निवडणुकीनंतर आम्ही बीजेपी किंवा आरएसएसबरोबर समझोता करणार नाही. तेव्हा आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते, ते त्यावर काहीच बोलले नाहीत. ते शांत बसले आणि एका अर्थाने मौनातून त्यांनी विरोध दर्शविला. आपणच फक्त म्हणालात की “लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे?” ज्या शिवसेनेला आपण सोबत घेतले आहे. त्या शिवसेनेचे प्रतिनिधी संजय राऊत यांनी उघडउघड असे लिहून देण्यास नकार दिलेला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर बघितले तर आम्हाला जर आपल्याबरोबर यायचे असेल, तर आम्हाला खात्री करुन घ्यावी लागेल की तुम्ही निवडणूक झाल्यानंतर बीजेपीबरोबर जाणार नाहीत, याची खात्री तुम्हाला द्यावी लागेल आणि ती व्यक्तीगत नाही तर तुमच्या पक्षाला द्यावी लागेल. आपण लिहीलेले हे पत्र सोशल मीडियावर टाकले आहे का हे आम्हाला माहीत नाही. तुम्ही जर हे सोशल मीडियावर दिले नसेल तर आम्ही ही आपल्याला आश्वासित करतो की, आमचे हे पत्र सोशल मीडियावर जाणार नाही. परंतु, आपले पत्र जर सोशल मीडियावर गेले तर आमचे पत्रही सोशल मीडियावर जाईल.