मुंबई : आज ६ मार्च रोजी महाविकास आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत निवडणुकीचा फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे आजच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वी आंबेडकरांच्या ट्विटमुळे महाविकास आघाडीतील युतीबाबत संशय निर्माण झाला होता. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात १० जागांवरुन भांडण सुरू आहे आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे ५ जागांवर भांडण सुरू आहे, त्यामुळे त्यांचे भांडण संपले की आमच्याशी चर्चा सुरू होईल अशा आशयाचं ट्विट प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. मात्र वंचितला सोबत घेण्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार आग्रही आहेत. यासाठी मंगळवारी सायंकाळी दोघांमध्ये सिल्व्हर ओकवर त्यांची बैठक झाली होती. दीड तास झालेल्या या बैठकीत काही मतदारसंघासाठी अडलेले जागावाटप आणि वंचितच्या भूमिकेबाबत चर्चा झाल्याचं समजते.
सद्यस्थितीत लोकसभेच्या १२ जागांवर शरद पवार गटाने दावा केला आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने १७ आणि काँग्रेसकडून २० जागांचा आग्रह आहे. मात्र वंचितला सोबत घ्यायचं असेल तर तिन्ही पक्षांना काही जागा सोडाव्या लागतील. तरी आजच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर सहभागी होतील असं सांगितलं जात आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटतो की युती फिस्कटते हे पुढील काही तासात स्पष्ट होईल.