मुंबई– केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्म घडामोडी घडताना दिसतायेत. छत्रपती संभाजीनगर आणि जळगावात अमित शाहा यांच्या मंगळवारी जाहीर सभा झाल्या. या दोन्ही सभांतून अमित शाहा यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या १० वर्षांच्या कार्यकाळात देशात झालेल्या विकासाचा पाढाच त्यांनी सभांमध्ये सांगितलाय. छत्रपती संभाजीनगरच्या सभेत त्यांनी या मतदारसंघातून कमळ निवडून द्या, असं सांगितल्यानं या मतदारसंघआतून भाजपाला उमेदवारी मिळेल अशी चर्चा आता सुरु झालीय.
सभेत काय म्हणालेत अमित शाहा?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना आयुष्यभर विरोध केला त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे जाऊन बसले आहेत, त्यांना लाज वाटायला हवी. या शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतलाय.तर गेल्या ५० वर्षांपासून शरद पवारांचं ओझं महाराष्ट्र वाहतोय. त्यांनी या वर्षांत राज्यासाठी काय केलं, असा सवालही अमित शाहा यांनी उपस्थित केलेला आहे.
निजाम यांना घरी बसवा आणि मजलिस यांना छत्रपती संभाजीनगरमधून उखडून फेकून द्या आणि मोदींना संभाजीनगरमधून कमळ पाठवा, असं शाहा सभेत म्हणाल्यानं ही जागा भाजपाला जाणार असल्याचं मानण्यात येतंय.
भाजपाला महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागी जिंकून द्या, असं आवाहनही शाहांनी मतदारांना केलंय,
निजामासारखं तुम्ही वागताय- इम्तियाज जलील
अमित शाहा यांच्या या सभेनंतर संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी अमित शाहा यांना प्रत्युत्तर दिलंय. भाजपाच निजामासारखी वागत आहे. देशाला तोडण्यासाठी प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केलीय.
अमित शहा म्हणतात की उखाड के देंक देंगे अमित शहा यांना ही भाषा शोभते का? ते देशाचे गृहमंत्री आहेत. आपल्या मतदारसंघात येऊन धमकी दिल्यासारखं त्यांना शोधत नाही, असंही जलील म्हणालेत. लोकशाही मार्गाने लोकांनी आापल्याला निवडून दिले, त्यावेळी सुद्धा हीच परिस्थिती होती जी तुम्ही आज लोकांना सांगत आहे. तुम्ही कितीही करा काहीही करा लोकांना माहित आहे, की भारतीय जनता पार्टी काय करतेय. अ्संही खासदार जलील म्हणालेत.
निजामाशी आपलं काही देणं घेणं नाही. निजाम एका काळात होते, ते गेले, मेले संपले जे काम निजाम देशाला तोडण्याचे फोडण्याचे काम करत होते ते काम दुर्दैवाने कोणता पक्ष करत आहे ते मला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. आता एमआयएमच्या सभा होऊ द्या तुम्हाला एका एका शब्दाचे उत्तर देतो. असं प्रतिआव्हान देण्यात आलेलं आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचीही टोलेबाजी
संभाजीनगरमध्ये कमळ लढवेल की शिंदे गट लढवेल माहिती नाही. त्यांच्यात भांडण सुरु आहेत. असं सांगत ठाकरे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही भाजपावर टोलेबाजी केलीय. उद्धव बाळासाहेबठाकरे पक्षासमोर महायुतीची ताकद काहीच नाहीये. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे मतदारसंघात विजय उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा होणार, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.