मुंबई
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उद्या २७ फेब्रुवारी मंगळवारी होणाऱ्या मविआच्या बैठकीला अनुपस्थितीत राहणार असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात उद्या होणाऱ्या जाहीर सभेचं कारण पुढे करीत आंबेडकरांनी उपस्थित राहता येणार नसल्याचं सांगितलं आहे.
मात्र मविआने आपली बैठक उद्याऐवजी परवा ठेवली तर आम्हाला सोईचं होईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रकाश आंबेडकरांच्या मनात नेमकं काय शिजतंय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रकाश आंबेडकरांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष जयंत पाटील यांचा काल फोन आला होता. त्यांनी २७ फेब्रुवारीला बैठक असल्याचं सांगितलं. मात्र पुण्याला जाहीर सभा असल्या कारणाने आम्ही २७ तारखेला येऊ शकणार नाही. २८ तारखेला शक्य होत आहे का ते पाहा, असं आंबेडकरांकडून सांगण्यात आला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी शनिवारी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवलं होतं. या पत्रात त्यांनी येत्या दोन दिवसात जागावाटपाचा निर्णय जाहीर करण्याचं भाष्य केलं होतं. २२ फेब्रुवारी रोजी काँग्रेस कमिटीने पत्रकार परिषद घेत २७ किंवा २८ फेब्रुवारी रोजी अधिकृत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं होतं.
दरम्यान कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र जागावाटपावरुन वंचित, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये एकमत होणार का, ते येत्या दोन दिवसात समोर येईल.