नाशिक
२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करीत असताना इकडे उद्धव ठाकरे नाशिकमधील काळा राम मंदिरात पूजा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २ मार्च १९३० रोजी अस्पृश्यांचा प्रवेशासाठी याच मंदिरात सत्याग्रह करण्यात आला होता.
उद्धव ठाकरेंना अयोध्या राम मंदिराचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. परिणामी उद्धव ठाकरे नाशिकच्या काळा राम मंदिरात पूजा करणार असल्याचं समोर आलं आहे. हिंदूत्वाची लढाई शिगेला पोहोचणार असल्याचं चित्र आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिमध्ये उद्धव ठाकरेंचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यापूर्वी २२ तारखेला उद्धव ठाकरे नाशकात जाऊन काळा राम मंदिरात पूजा करणार आहेत. यानंतर दुसऱ्या दिवशी २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरेंचा भव्य मेळावाआयोजित करण्यात येणार आहे.
२०२३ या वर्षाच्या सुरुवातील ठाकरे गटाला गळती लागली होती. आमदार-खासदारांनंतर नाशिक महापालिकेतील १२ नगरसेवक शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला होता. गेल्यावर्षीही डॅमेज कंट्रोलसाठी त्यांनी नाशिक दौरा केला होता.