By Supriya Gadiwan
मुंबई : पुण्यातील स्वारगेट बस आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेबद्दल पुण्यासह राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. स्वारगेट बस स्थानकातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळ अलर्ट झाले असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. एस टी महामंडळाच्या चालक वाहकांनी कर्तव्यावर असताना मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार गणवेश परिधान करूनच कर्तव्य बजावण्याची सक्ती करण्यात आली आहे.
स्वारगेट बस आगारातील स्थानकावर अत्याचार घडल्याने एसटी महामंडळ निशाण्यावर आले. या सगळ्या प्रकरणानंतर राज्य परिवहन महामंडळाने मोठा निर्णय घेत चालक, वाहकांनी व सर्व गणवेशधारी कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेल्या गणवेशातच कर्तव्य बजावण्याचे आदेश वाहतूक विभागाने दिले आहेत. सद्यस्थितीत खाकी गणवेशाशिवाय चालक – वाहक कर्तव्यावर दिसून येत आहेत. त्यामुळे महामंडळाची प्रतिमा खराब होत आहे. त्यामुळे आता वाहतूक विभागाने हा आदेश जारी केला आहे.
कोणत्याही परिस्थितीत चालक वाहकांना खाकी रंगाचे लोगो एम्ब्रॉयडरी केलेले टी-शर्ट गणवेश म्हणून परिधान करण्यास पूर्ण बंदी घालावी असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, स्वारगेट एसटी आगार बलात्कार प्रकरणी नराधम दत्ता गाडे याला जिल्हा सत्र न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.