Twitter : @NalavadeAnant
मुंबई
सरकारचा शासन आपल्या दारी (Shasan Apalya Dari) हा कार्यक्रम अपयशी ठरल्यानेच जनतेला शासनाच्या दारी जावे लागत आहे. परंतु शासनाने जनतेची तिथेही अडवणूक केली आहे. मंत्रालयात होत असणाऱ्या आंदोलनाचा सरकारने धसका घेतला असून मंत्रालय प्रवेशासाठी जाचक नियम बनवले आहे. सरकारचे हे अपयश असून मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कोणतीही कामे होतच नसल्याचा धडधडीत पुरावा आहे, अशा खोचक शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी बुधवारी सरकारला धारेवर धरले.
वडेट्टीवार म्हणाले की, मंत्रालयात प्रवेश मिळण्यासाठी अनेक जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. सुरक्षेची कारणे देत सर्वसामान्यांना मंत्रालयाबाहेर ताटकळत उभे केले जात आहे. त्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत नागरिक ताटकळत उभे राहतात. त्यांना सायंकाळी प्रवेश मिळाल्यावर कार्यालयीन कामकाजाची वेळ संपते. त्यामुळे हताश होऊन नागरिक परत जात असल्याने आता सरकारनेच नागरिकांचे हाल थांबविले पाहिजेत,अशी आग्रही मागणीही त्यांनी यावेळी केली.
शासन आपल्या दारी उपक्रमावर कोट्यवधी रुपये खर्च या सरकारने केला खरा पण या उपक्रमात जनतेची कामे खरोखरच झाली असती तर त्यांना मंत्रालयापर्यंत येण्याची गरज पडली असती का ? असा सवाल करत शासन आपल्या दारी उपक्रम पूर्णपणे अयशस्वी झाला, केवळ प्रसिद्धीसाठी हा कार्यक्रम राबविला जात असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे.