सावरकरांच्या वक्तव्याप्रकरणी नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याच प्रकरणी आता राहुल गांधींना न्यायाधीशांनी नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राहुल गांधींना मोठा धक्का बसला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. याप्रकरणी नाशिकमधील सरकार वाडा या पोलीस स्टेशनमध्ये सावरकर प्रेमीकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानुसार याप्रकरणी आज एक मार्च रोजी सुनावणी झाली, मात्र या सुनावणीला राहुल गांधी प्रत्यक्ष उपस्थित नव्हते, त्यांच्या वकिलामार्फत ते उपस्थित होते. मात्र आता कोर्टाच्या आदेशानंतर पुढील सुनावणीवेळी ते स्वतः कोर्टात हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आज झालेल्या सुनावणीत राहुल गांधी यांनी ऑनलाइन उपस्थिती न दर्शवता प्रत्यक्षरीत्या उपस्थित राहण्याचे नाशिक कोर्टाने आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी आता मे महिन्यात होणार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.