मुंबई : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात हस्तक्षेप याचिकेवर आज सुनावणी पार पडली. त्यानंतर शिक्षेप्रकरणी आज निकाल येईल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली असून याचा फैसला आता ५ मार्च रोजी होणार आहे.
कृषिमंत्री कोकाटे यांना झालेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये, या मागणीसाठी अंजली दिघोळे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. आज होणाऱ्या शिक्षेच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलं असताना सुनावणी लांबणीवर पडल्याने कृषिमंत्री कोकाटे यांची धाकधूक वाढली आहे. त्यांच्यावरील आमदार अपात्रतेची टांगती तलवार कायम असून दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या अधिवेशनातही या मुद्द्यावरून विरोधक त्यांच्याविरुद्ध आक्रमक होण्याची शक्यता आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यावर कागदपत्र फेरफार आणि फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आले आहेत. याप्रकरणी तत्कालीन मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता त्यांची आमदारकीही धोक्यात आली आहे. त्यामुळे येत्या ५ मार्चला कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना जेल होणार का बेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.