सोलापूर : महाविकास आघाडीतून सोलापूरच्या उमेदवार काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी मैदानात उतरणार आहे. येत्या २४ एप्रिल रोजी राहुल गांधी यांची सोलापूरात सभा पार पडणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे विरूद्ध भाजपचे राम सातपुते अशी लढत होणार आहे. प्रणिती यांनी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवला आहे. तर राम सातपुते हे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे. मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांना माढ्यातून तिकीट दिल्यानंतर मोहिते पाटील कुटुंबाचा मविला पाठिंबा मिळाला आहे. सोलापूरातही मोहिते पाटील घराण्यांचं कंट्रोल आहे. त्यामुळे या लोकसभेत प्रणिती शिंदे यांना याचा फायदा होऊ शकतो.
दरम्यान प्रणिती शिंदे यांना जिंकून देण्यासाठी काँग्रेसकडूनही प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनीही प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापूरात सभा घेतली होती. आता प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी थेट राहुल गांधी मैदानात उतरले आहेत. २४ एप्रिल रोजी मरीआई चौकातील एग्झिबिशन मैदानावर दुपारी तीन वाजता ही सभा होणार आहे. राहुल गांधी लातूर विमानतळावरुन सोलापूरला येणार आहेत.
लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर करण्यापूर्वी प्रणिती शिंदे यांना भाजपची ऑफर असल्याची चर्चा होती. पण त्यांनी काँग्रेस सोडणार नसल्याचं वारंवार सांगितलं आहे. या चर्चा सुरू असतानाही त्यांचे मतदार संघातील दौरे, गावभेटी आणि कॉर्नर बैठका सुरूच होत्या. यंदा 2024 मध्ये पहिल्यांदा प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
सोलापूरात मध्य सोलापूर सोडला तर उतरलेले चार विधानसभा भाजप आणि एक जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे आहे. प्रणिती शिंदे आतापर्यंत त्यांचा मतदारसंघ मध्य सोलापूरात काम करीत होत्या. मात्र आता त्यांच्यासाठी मोठं आव्हान ठरणार आहे.