X : @milindmane70
महाड – शैक्षणिक वर्षाला नुकतीच सुरुवात झाली आहे. महिनाभर बंद असलेल्या शाळा पुन्हा बोलक्या झाल्या आहेत. मात्र रायगड (Raigad) जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी तेरा तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांची (Block Education officer) पदे गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहेत. जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षणाचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, अलिबाग, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, तळा, महसळा, माणगाव, महाड ,पोलादपूर या १५ पैकी केवळ खालापूर या तालुक्यातच गटशिक्षणाधिकारी उपलब्ध आहे. म्हसळा तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पदाची नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र अद्याप त्या जागी संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. जिल्ह्यातील उर्वरित तेरा तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पद रिक्त आहे.
राज्याचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून राज्याचे व देशाचे राजकारण करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना मात्र शालेय शिक्षणाबद्दल आस्था नसल्याचे दिसून येत आहे. गेले दोन वर्षाहून अधिक काळ ही रिक्त आहेत, यामुळे शैक्षणिक उपक्रम राबवताना किंवा प्राथमिक शिक्षणाच्या (Primary education) बाबतीत निर्णय घेताना तालुकास्तरावर अनंत अडचणी निर्माण होत आहेत. शिक्षकांमध्ये (teachers) समन्वय नाही. ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या मुलांना योग्य दर्जाचे शिक्षण मिळत आहे की नाही याचे नियंत्रण असणारे गटशिक्षणाधिकारीच उपलब्ध नसल्याने शिक्षणाचे तीन – तेरा वाजले आहेत.
सुट्ट्या संपल्यानंतर शालेय मुलांना लागणारे शैक्षणिक साहित्य, शालेय कपडे त्याचबरोबर पोषण आहार आणि इतर शैक्षणिक उपक्रमाबाबत गटशिक्षण अधिकारी हे पद महत्त्वाचे ठरते. एकीकडे शिक्षणावर करोडो रुपये खर्च केल्याचे दाखवले जात असताना दुसरीकडे पदांची भरती होत नसल्याने शिक्षणाचे तीन तेरा वाजत आहेत. महाड तालुक्यात विस्तार अधिकारी सुनिता चांदोरकर यांना गटशिक्षणाधिकारी प्रभारी पद देण्यात आले, मात्र काही दिवसांनी त्यांची उपशिक्षणाधिकारी म्हणून देखील नियुक्ती केली गेली. यामुळे सौ. सुनीता चांदोरकर या कायम अलिबाग येथे असतात, महाडमध्ये क्वचितच येत असतात.
विस्तार अधिकाऱ्यांकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार
रायगड जिल्ह्यातील तेरा तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार तालुक्यातील विस्तार अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी सौ. पूनिता गुरव यांनी सांगितले. गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत ती भरण्यासाठी शासनाकडे मागणी देखील केल्याचे त्यांनी सांगितले.