मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (Uddhav Thackeray) विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी लागला असून यासाठी पक्षाने विदर्भात मास्टरप्लॅन तयार केला आहे . या पार्शवभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav )सध्या नागपूर आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान ते पूर्व विदर्भातील तीस विधानसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत.विदर्भातील जास्तीत जास्त जागांवर दावा करण्याची रणनीती त्यांनी आखली असून त्यामुळे विदर्भ काँग्रेसची डोकेदुखी वाढणार असल्याच्या चर्चाना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे .
या विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील 30 विधानसभा क्षेत्रांपैकी किमान 14 जागांवर दावा केला आहे .तसेच या विदर्भात पक्ष किती विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढू शकतो, किंवा किती जागा जिंकू शकतो, याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. ज्या 14 जागांवर सध्या भाजपचे आमदार आहे किंवा शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत. त्या जागांवर आमचा नैसर्गिक दावा असल्याचे मतही जाधव यांनी व्यक्त केल आहे . तसेच त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी पूर्व नागपूर, मध्य नागपूर आणि दक्षिण नागपूर अशा तीन मतदारसंघांवर दावा केला आहे . तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी कामठी, हिंगणा, रामटेक, आणि उमरेड तब्बल चार विधानसभा क्षेत्रांमध्ये आमचे उमेदवार राहतील, असा दावा उद्धवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केला आहे . त्यामुळे उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन विदर्भ काँग्रेसची डोकेदुखी वाढवणार का, की उद्धव ठाकरे यांना यात यश येतं, हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालात महविकास आघाडीने बाजी मारून भाजपला चांगलाच धक्का दिला आहे .विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने (Congress) दहा पैकी 7 मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी असे महायुतीला यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने बाजी मारली असून काँग्रेस विदर्भातही सर्वत मोठा पक्ष ठरला आहे. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मविआ, महायुतीसह इतर पक्षही जोमाने तयारीला लागले आहे.आता उद्धव ठाकरेंचं मिशन विदर्भ विधानसभा निवडणुकीत यश मिळवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .