Twitter: @vivekbhavsar
मुंबई
धुळे जिल्ह्यात फोफावलेली गुंडगिरी, शस्त्रांस्त्रांचे कारखाने आणि तस्करी तसेच शेकडो एकरवर होणारी गांजाची शेती याकडे दुर्लक्ष करून केवळ बदल्यांमध्ये लक्ष घालून ‘माया ‘ जमवणारे धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची अखेर आज बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक या दुय्यम आणि दुर्लक्षित विभागात पोलीस अधीक्षक म्हणून त्यांना पाठवण्यात आले आहे. ही एक प्रकारची शिक्षा समजली जात आहे.
धुळे जिल्ह्यात फोफावलेल्या गुंडगिरी विरोधात ‘राजकारण’ (Therajkaran) ने ‘ देवेंद्रजी, धुळे पोलीस अधीक्षकांना आवरा‘ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दाखल घेतली होती. प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी धुळे पोलीस अधीक्षकांवरील कारवाईचे संकेत दिले होते. दिवाळी संपल्यानंतर पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची बदली होईल हे जवळपास निश्चित होते. दोन दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी बारकुंड यांच्या बदलीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आणि अंतिम मंजुरीसाठी फाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवली. मुख्यमंत्री शिंदे यांनी दौऱ्यावर जाण्यापूर्वी फाईलवर मोहोर उठवली आणि बारकुंड यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. बारकुंड यांची जागा पुणे लोहमार्गचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे घेतील.