X : @milindmane70
मुंबई
राज्यसभा निवडणुकीसाठी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विश्वास जगताप यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्यानंतर मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. मात्र आज पडताळणीअंती त्यांचा अर्ज बाद ठरल्याने आता निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर पाठवायच्या सहा सदस्यांसाठीची निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. यामध्ये भाजपाचे तीन व मित्र पक्षांचे दोन याप्रमाणे सत्तारूढ महायुतीचे पाच तर काँग्रेसचा एक सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला यातून काहीही मिळाले नाही. दरम्यान, निवडणूक निकालाची अधिकृत घोषणा 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. या निवडणुकीसाठी भाजपाकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांनी अर्ज भरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि शिवसेनेकडून मिलिंद देवरा हे उमेदवार आहेत. दरम्यान पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते विश्वास जगताप यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. पडताळणीअंती त्यांचा अर्ज बाद झाला आहे.
पुण्यातील समाजसेवक आणि पत्रकार विश्वास जगताप यांनी काल आपला उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु राज्यसभेचा अर्ज भरताना 10 आमदारांच्या सह्या लागतात. त्यामुळे छाननी दरम्यान त्यांचा अर्ज बाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
भाजप – अशोक चव्हाण
मेधा कुलकर्णी
डॉ अजित गोपछडे
शिवसेना शिंदे गट – मिलिंद देवरा
राष्ट्रवादी अजित पवार गट – प्रफुल पटेल
काँग्रेस – चंद्रकांत हांडोरे
राज्यसभेवर निवडून गेलेल्या सदस्यांमध्ये मेधा कुलकर्णी या पुण्यातील कोथरूडच्या माजी आमदार आहेत. तर डॉक्टर अजित गोपछडे हे नांदेडचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. जून २०२२ मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असतानाही माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. आता मात्र काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवून एक प्रकारे न्याय दिल्याचे सांगण्यात येत आहे. तर शिंदे गटाने माजी खासदार मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर पाठवून मुंबई महानगरपालिकेसाठी तयारी सुरू केल्याचे निष्पन्न होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा सदस्य असलेले प्रफुल पटेल यांना अजित पवार गटात गेल्यानंतर पुन्हा उमेदवारी देण्यात आली. प्रफुल पटेल यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ मे २०२७ मध्ये संपणार आहे. तरीही त्यांना उमेदवारी देण्यात आली. याचे मुख्य कारण म्हणजे शरद पवारांनी प्रफुल पटेल यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करावे यासाठी राज्यसभेच्या सभापतींकडे याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल काही दिवसांनी आला तर प्रफुल पटेल हे राज्यसभेतून बाद ठरू शकतील, पुन्हा त्यांना निवडणूक लढता येणार नाही, यासाठी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व स्वतःचा मुलगा पार्थ पवार यांचे नाव बाजूला ठेवून प्रफुल पटेल यांना पुन्हा संधी दिली.
राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र शरदचंद्र पवार गट व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांना मोठी नामुष्की पत्करावी लागली आहे. आगामी काळात लोकसभा सोबतच महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदा यांच्या निवडणुक होणार अहते. शिवसेनेचा एक राज्यसभा सदस्य कमी झाल्याने शिवसेनेला पक्ष फुटीनंतर हा मोठा धक्का असल्याचे मत राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केले जात आहे.