मुंबई : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे धाकटे पूत्र सिद्धेश कदम यांची MPCB च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रामदास कदम भाजप विरोधात बोलत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांचे पूत्र सिद्धेश कदम यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त सनदी अधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांना हटवण्यात आलं आहे. आबासाहेब जऱ्हाड प्रदीर्घ काळ गैरहजर असल्याचे नमूद करीत त्यांना हटवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
रामदास कदम यांचा मोठा पुत्र आमदार योगेश याला गजानन कीर्तीकर यांच्या मतदारसंघातून लोकसभा तिकीट द्या अशी मागणी रामदास कदम यांच्याकडून केली जात होती. मात्र याला कीर्तीकर यांचा विरोध होता. त्यातून या दोघांनी एकमेकांविरोधात पत्र जाहीर करीत अब्रु चव्हाट्यावर आणण्याचं काम केलं होतं. त्यामुळे रामदास कदम यांना शांत करण्यासाठी त्यांच्या लहान पूत्राला मोठं पद देण्यात आल्याची चर्चा आहे.
काय आहे नेमका वाद…
शिंदे गटातील दोन्ही ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि खासदार गजानन कीर्तीकर यांच्यातील वादामुळे शिंदे गटाची कोंडी झाली होती. गजानन कीर्तीकर यांनी प्रेसनोट काढत त्यामध्ये रामदास कदम यांच्यासाठी गद्दार असा उल्लेख करत आरोप केला होता. या प्रेसनोटमध्ये त्यांनी लिहिलं होतं, ३३ वर्षांपूर्वी रामदास कदमांनी त्यांना कांदिवलीमध्ये पाडण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर संतप्त झालेल्या रामदास कदम यांनी गजानन कीर्तीकर यांच्यावर आरोप केले होते. यावर ते म्हणाले होते की, कांदिवलीला शाखाप्रमुख म्हणून मी जे काम केलं होतं, त्या जोरावर गजानन कीर्तीकर निवडून आले होते. आता एवढ्या वर्षांनंतर कीर्तीकरांना मी त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता, याची आठवण झाली का?
यावेळी एकनाथ शिंदेंना मध्यस्थी करावी लागली होती. मात्र रामदास कदम आपल्या प्रत्युत्तरावर ठाम होते. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं. कुठलीही शहानिशा न करता मला राजकारणातून संपवण्याकरता एखादी प्रेसनोट काढणं किपत योग्य आहे, असा सवालही कदमांकडून उपस्थित करण्यात आला होता. गेल्या वर्षी दिवाळीत गजानन कीर्तीकरांना शुभेच्छा देऊन वाद संपल्याचं रामदास कदमांन जाहीर केलं होतं.