X: @therajkaran
मुंबई : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील आमदार रवींद्र वायकर लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जोगेश्वरीतील राखीव भूखंडावर हॉटेल उभारून आर्थिक फायदा करून घेतल्याबद्दल त्यांच्याविरोधात ईडीची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात त्यांच्या पत्नीविरोधातही गुन्हा दखल करण्यात आला आहे. या चौकशीतून बाहेर पडण्यासाठी वायकर यांनी शिंदे गटाशी जवळीक साधल्याची माहिती आहे.
जोगेश्वरी प्रकरणामुळे वायकर अडचणीत
जोगेश्वरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे आमदार रवींद्र वायकर अडचणीत आले आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर रवींद्र वायकर यांच्यामागे ईडी चौकशीचा ससेमिरा सुरू झाला. ईडीने या प्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे. तसेच रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकर यांची भेट घेऊन पक्ष तुमच्या पाठिशी असल्याचे सांगितले. आमदार रवींद्र वायकर यांना ईडीच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले होते.
अलीकडेच मुंबई महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात आधीच्या भूमिकेत बदल करून वायकर यांना मदत होईल अशी मवाळ भूमिका घेतली. त्यामुळे वायकर हे ठाकरे गटाला रामराम करणारे हे स्पष्ट झालं होतं. वायकर हे लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा आहे.