मुंबई : मुंबई मेट्रो प्रशासनाने दिव्यांग प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत मोठी सवलत जाहीर केली आहे. मेट्रो लाईन-३ वर मासिक प्रवास पासवर २५% सवलत देण्यात येणार असून ही सुविधा पुढील दहा दिवसांत लागू होणार आहे. समावेशक आणि सुलभ प्रवासाच्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार्ह मानला जात आहे.
मात्र, या निर्णयामागे दिव्यांग प्रवाशांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारे ज्येष्ठ पत्रकार आणि आरोग्यदूत दीपक कैतके यांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. काही आठवड्यांपूर्वी त्यांनी राज्य शासन व मुंबई मेट्रो प्रशासनाकडे दिव्यांगांसाठी प्रवास सवलतीची मागणी केली होती. अखेर त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात कैतके यांनी @MumbaiMetro3 आणि मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांना उद्देशून ट्वीट करत पुढील मागणी केली आहे:
“दिव्यांग नागरिकांना मिळणारी सवलत त्यांच्या दिव्यांगत्वाच्या टक्केवारीनुसार ठरवावी. मेट्रो ३ अद्याप पूर्णपणे सुलभ नसल्याने प्रवासादरम्यान सहाय्यक घ्यावा लागतो. त्यामुळे कृपया किमान ५०% सवलतीचा विचार करावा.”
दिव्यांग नागरिकांकडूनही २५% सवलत अपुरी असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. कारण अद्याप मेट्रो लाईन-३ वर काही पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आवश्यक असून प्रवासात सहाय्याची गरज भासते.
तज्ज्ञांचे मत असे आहे की, मेट्रो प्रशासनाने समावेशक प्रवासाचा संकल्प केला असला तरी, व्यवहार्य सवलत मॉडेल आणि सुलभता वाढवणाऱ्या सुविधा यांवर सरकार, मेट्रो प्रशासन आणि नागरी समाज यांचे एकत्रित प्रयत्न आता वेळेची गरज आहे.

