X : @AnantNalavade
मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही मुंबई महानगर पालिका आयुक्त आय एस चहल, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, अश्विनी भिडे आणि पी. वेलारसू यांची बदली न झाल्याने मुंबईतील निवडणुका मोकळ्या आणि निर्भय वातावरणात पार पडणार नाहीत, अशी दाट शंका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांची तातडीने बदली करावी, अशी आग्रही मागणी करतानाच, यासंदर्भात आपण केंद्रीय निवडणूक आयोगालाही पत्र लिहिल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
मंत्रालयासमोरील त्यांच्या शासकीय निवासस्थानी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, या तीनही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे स्पष्ट निर्देश असताना, आजही हे अधिकारी मुंबई महानगर पालिकेत ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्या बदल्या वेळीच झाल्या पाहिजेत. ज्या अधिकाऱ्यांच्या एकाच जिल्ह्यात तीन वर्ष सेवा पुर्ण झाली आहे, अशांच्या बदल्या झाल्याच पाहिजेत, असे निवडणुक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा आपण मांडला होता. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने थेट केंद्रीय निवडणूक आयोगालाच पत्र दिल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.
मुंबई महापालिकेत सुधाकर शिंदे हे आएएएस नसताना देखील मोठ्या पदावर आहेत. हे अधिकारी मर्जीतील असल्याने ते पक्षपातीपणा करू शकतात, तसेच निधी वाटपातही दुजाभाव करू शकतात, याकडे लक्ष वेधत हे अधिकारी निवडणुकीवर प्रभाव पाडू शकत असल्याने या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त केले पाहिजे. मुंबई महापालिका आता भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे. राज्य सरकारने याला वेळीच आळा घातला पाहिजे. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना सरकारने पाठीशी घालू नये, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारला यावेळी सुनावले.
दरम्यान, मुंबईतील साकीनाका येथील क्रांती नगर, बैल बाजार झोपडपट्टीधारकांसाठी सदनिकांची चावी वाटप करण्यात आल्या असून यामध्ये शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. चावी वाटप करताना बोगस नावे घुसविण्यात आली आहेत. त्यानंतर लगेच या सदनिकांची खरेदी केली गेली. यातील काही लोक उत्तर प्रदेशातील आहेत. ही सरकारची फसवणूक आहे.अधिकारी आणि लोकप्रतिनीधींच्या संगनमताने हा घोटाळा झाला असल्याने याची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे वडेट्टीवार यांनी ठामपणे नमूद केले.
Also Read: …… हे संजय राऊतासारख्या तीनपट माणसाला काय सांगायचं : नितेश राणेंचा टोला