आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश – केंद्राकडे ठराव पाठवणार
मुंबई: क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न प्रदान करण्यासाठी विधानसभेत ठराव संमत करून तो केंद्र सरकारकडे पाठवला जाणार असल्याची घोषणा राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत केली. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीसाठी अशासकीय ठराव मांडला होता, त्याला उत्तर देताना हा ठराव पुढील आठवड्यात अधिकृत स्वरूपात संमत करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महात्मा फुले दाम्पत्याच्या कार्याचा गौरव
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या ठरावात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेसाठीच्या योगदानाचा गौरव केला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, स्त्री शिक्षण आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून नव्या विचारांची चळवळ उभी केली. आजच्या काळात महिलांना शिक्षण आणि समानतेचे हक्क मिळाले आहेत, त्यामागे सावित्रीबाई फुले यांचे अतुलनीय योगदान आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
येत्या १० मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी असल्याने, त्या दिवशीच हा ठराव संमत करण्यात यावा, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली. आतापर्यंत ४८ जणांना भारतरत्न मिळाले असून, त्यातील १४ जणांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे ४९वा भारतरत्न हा फुले दाम्पत्याला प्रदान करावा, अशी त्यांची आग्रही मागणी आहे.
ठरावाला सरकारचा पाठिंबा
या ठरावावर उत्तर देताना मंत्री जयकुमार रावल यांनी फुले दाम्पत्य हे महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहेत, असे सांगत हा ठराव राज्य सरकारच्या वतीने विधानसभेत मांडण्यात येईल, असे आश्वासन दिले.
आ. मुनगंटीवार: “अभिमानाचा क्षण”
“जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा ठराव मांडताना मला अभिमान आणि सौभाग्य वाटते. शिक्षण नावाचे अद्भुत अमृत आपण पिऊ शकलो, ते फुले दाम्पत्यामुळेच. त्यांना भारतरत्न मिळावे, ही संपूर्ण देशाची भावना आहे,” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आ. मुनगंटीवार यांनी दिली.