मुंबई
महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १० जणांचं शिष्टमंडळ दावोसला गेलं आहे. या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसात महाराष्ट्राने तब्बल ३ लाख ५३ हजार ६७५ कोंटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत. तर १ लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असून यामुळे राज्यात २ लाख रोजगारनिर्मिती होईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.
यापूर्वी दावोस दौऱ्यात ५० जणांचा लवाजमा घेऊन जाण्याविरोधात आदित्य ठाकरेंकडून टीका करण्यात आली आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार यांनीही या दावोस दौऱ्यावरुन निशाणा साधला आहे.
राज्य सरकारच्या दाव्यानुसार दावोसमधून आत्तापर्यंत ९५ हजार कोटींचे MOU झाले आहेत, परंतु ९५ हजार कोटींच्या गुंतवणुकीपैकी ज्या तीन कंपन्यांसोबत ९१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे MOU झाले त्या B.C JINDAL GROUP, INOX AIR PRODUCTION आणि JSW STEEL या कंपन्या भारतीय आहेत. हा प्रकार म्हणजे फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन घरच्याच डब्यातील जेवण करून येण्यासारखा आहे, अशा शब्दात रोहित पवारांकडून टीका करण्यात आली.
भारतातल्याच कंपन्यांशी MOU करायचे होते तर मग शासकीय तिजोरीतील ३४ कोटी रुपयांचा चुराडा करत एवढा मोठा लवाजमा घेऊन दावोसला जाण्याची काय गरज होती? असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, त्यापेक्षा व्हायब्रंट गुजरातसारखा कार्यक्रम महाराष्ट्रातच घेतला असता तरी चाललं असतं; पण कदाचित मॅग्नेटिक महाराष्ट्र घेतला असता तर व्हायब्रंट गुजरातमध्ये गुंतवणूक आली नसती ही भीती असावी म्हणून या सरकारने दावोस मध्येच भारतीय कंपन्यांसोबत करार केले असावेत.