मुंबई: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यात गंभीर जखम झाल्यानंतर त्याला वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चोरासोबत झालेल्या झटापटीत सैफच्या मणक्याला चाकूने गंभीर जखम झाली. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे.
सैफवर उपचार करणाऱ्या टीममध्ये लीलावती रुग्णालयाचे मुख्य ऑपरेटिंग अधिकारी डॉ. नीरज उत्तमाणी, विश्वस्त प्रशांत मेहता, न्युरोसर्जन डॉ. नितीन डांगे, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास कुद्वा यांचा समावेश आहे.
डॉ. नीरज उत्तमाणी यांनी सांगितले की, सैफवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्याला सध्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. पुढील एक-दोन दिवसांत त्याला जनरल वॉर्डमध्ये हलवले जाईल.
डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले की, हल्ल्यात सैफच्या मणक्याला मोठी दुखापत झाली होती. मणक्यात अडकलेल्या सुरीचा तुकडा काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. याशिवाय सैफच्या डाव्या हाताला आणि उजव्या गळ्याजवळ दोन खोल जखमा झाल्या होत्या. प्लास्टिक सर्जरी टीमच्या प्रमुख डॉ. लीना जैन यांच्या नेतृत्वाखाली प्लास्टिक सर्जरी करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सैफची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि त्याला लवकरच जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात येईल.