मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई : येणाऱ्या २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापक योजना आखण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात या कुंभमेळ्यात धार्मिक परंपरेचे दर्शन घडवण्यासाठी नाशिकच्या जवळ ‘महाकुंभा’ची निर्मिती करण्याचे सक्त निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
महाकुंभ प्रकल्पांतर्गत नाशिकजवळ एक भव्य संमेलन केंद्र उभारण्यात येणार असून ज्यामध्ये देशभरातील मंदिरे, तीर्थक्षेत्रे आणि सांस्कृतिक वारसा यांचे दर्शन भाविकांना होईल. या प्रकल्पामुळे नाशिकला धार्मिक केंद्र म्हणून जागतिक पटलावर आणण्यास मदत होईल.तसेच,मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने वाहतूक, गर्दी नियोजन,साधुग्राम, नदी आणि उपनद्यांचे शुद्धीकरण, तसेच रस्त्यांच्या रुंदीकरणावर भर दिला. समृद्धी महामार्ग, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर रस्ता आणि नाशिक शहराच्या सर्व मार्गांचे काँक्रीटीकरण करण्याचे निर्देश दिलेले असून भाविकांच्या सोयीसाठी ८ ते १० हेलिपॅड उभारण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.
कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस व्यवस्थापन, सीसीटीव्ही, बॅरिकेडिंग, सार्वजनिक ध्वनिक्षेपण यंत्रणा लागू करण्यावर भर देण्यात आला. साधुग्रामकरिता अधिक जमीन संपादन करून साधूंकरिता निवास व्यवस्था करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुंभमेळ्यात पाणी स्वच्छ ठेवण्याच्या उपाययोजना करण्यावर भर दिला. जलपर्णी काढण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात तसेच मुबलक प्रमाणात प्रसाधनगृहे उभारण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर रीलिजियस कॉरिडॉरच्या निर्मितीसाठी प्रस्ताव ठेवला असून, कुंभमेळ्याचे ब्रँडिंग करून जागतिक प्रचारासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. कुंभमेळ्यातील व्यवस्था आणि सुविधांमुळे नाशिकचा चौफेर विकास साधण्याचा मानस असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.या बैठकीत वरिष्ठ मंत्री, अधिकारी आणि संबंधित विभागांचे प्रमुख सहभागी झाले होते. सिंहस्थ कुंभमेळ्याचा हा प्रकल्प धार्मिक पर्यटनासाठी एक मोठा टप्पा ठरेल,असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.