लखनऊ
उत्तर प्रदेशात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये जागावाटपावर ठराव झाला आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा असून यातील ८० पैकी १७ जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार असून ६३ जागांवर सपा आपले उमेदवार उभे करणार आहेत.
उत्तर प्रदेश हे पहिलंच राज्य आहे, जिथं इंडिया आघाडीत जागावाटपावर एकमत होऊ शकले आहे. अद्याप पश्चिम बंगाल, बिहार आणि पंजाबमध्ये इंडिया आघाडीत जागावाटपावर एकमत होऊ शकलेलं नाही. दरम्यान रायबरेली, अमेठी, वाराणसी, गाझियाबाद, प्रयागराज आणि कानपूर या जागांवर काँग्रेस आपले उमेदवार लढवणार असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी सपा-काँग्रेस आघाडीमुळे राज्यात एनडीएऐवजी एकट्याने निवडणूक लढणाऱ्या बसपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आता तिरंगी लढतीमुळे पक्षाच्या मागील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान मायावतींसमोर असेल.
गेल्या निवडणुकीत सपा-आरएलडी युतीसोबत लढून बसपाला लोकसभेच्या 10 जागांवर यश मिळाले होते. दशकभरापूर्वी ‘बसपा’ने एकट्याने निवडणूक लढवली तेव्हा एकही जागा मिळू शकली नव्हत. लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागांसह राज्यातील भाजपचा विजय रोखण्यासाठी, काँग्रेसने सपाला सोबत घेतल्याचं दिसून येत आहे.
गेल्या निवडणुकीत सपा, बसपा आणि आरएलडी एकत्र लढले तेव्हा एनडीएला केवळ 64 जागा जिंकता आल्या, तर बसपाला 10 जागांवर यश मिळाले आणि सपाला पाच जागांवर यश मिळाले. काँग्रेसला केवळ रायबरेलीच्या जागेवर यश मिळाले. 2014 च्या निवडणुकीत बसपा आणि सपा यांच्यात युती न झाल्यामुळे एनडीएला 73 जागांवर यश मिळाले होते.