Twitter : @therajkaran
मुंबई
‘घड्याळ तेच वेळ नवी… या टॅगलाईनखाली ‘निर्धार नव्या पर्वाचा’ हा कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी दौर्याला ५ नोव्हेंबरपासून सुरुवात करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी शुक्रवारी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. हा दौरा पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्यात जाणार असून यामध्ये ‘निर्धार नवपर्वाचा, कार्यकर्ता व पदाधिकार्यांसोबत मेळावा’ घेतला जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यापूर्वी झालेल्या उत्तरदायित्व सभांना आम्हाला कसा प्रतिसाद मिळाला हे तुम्ही पाहिलेच आहेत. महाराष्ट्रातील जनता अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयावर विश्वास ठेवत आणखी व्यापक जनाधार राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि एनडीएचा वाढविण्यात यशस्वी होऊ, असा विश्वासही खा. तटकरे यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणूका लक्षात घेता येत्या १५ डिसेंबरपर्यंत ‘निर्धार नवपर्वाचा’ ही भूमिका घेऊन ‘घड्याळ तेच वेळ नवी’ या टॅगलाईनद्वारे संबंध महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचेही खा. तटकरे यांनी स्पष्ट केले.
हा दौरा संघटनेचा असून प्रदेशाध्यक्ष म्हणून हा दौरा आहे. अजित पवारांचा दौरा हा प्रशासकीय असेल, त्यात आमचे आमदार, दुसऱ्या पक्षाचे आमदार असा भेद नसेल असेही खा. तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.
आगामी लोकसभेसाठी एनडीए म्हणून आम्ही तयारी करत असून घड्याळ चिन्हावरच आम्ही निवडणुक लढणार असल्याचेही खा. तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.
५ ते ७ नोव्हेंबर पूर्व विदर्भात दौरा केल्यानंतर ९ नोव्हेंबरला निवडणुक आयोगाच्या तारखेसाठी दिल्लीत जाणार आहे. त्यातही कोणाला वाटेल अदृष्यशक्ती काम करतेय तर तसे नाही. आमच्या पक्षाची बाजू आम्ही मांडतो असा टोलाही खा. तटकरे यांनी शरद पवार गटाच्या नेत्या व सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना लगावला.
ज्याप्रमाणे आम्ही निवडणूक आयोगाकडे आमचे म्हणणे मांडत आहोत, त्याचप्रमाणे लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांत म्हणणे मांडता यावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राष्ट्रवादी पक्ष म्हणून माझीही हीच इच्छा आहे. मीसुद्धा दोन्ही सचिवालयात तसे पत्रही दिले आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा फौजिया खान यांच्याविरोधात याचिका केली आहे. आम्हीसुद्धा लोकशाही अबाधित रहावी म्हणून दाखल केले आहे असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना खा. तटकरे यांनी पक्षाची भुमिका स्पष्ट केली.
मराठा आरक्षणावर बोलताना सरकार तत्परतेने मराठा आरक्षण देण्यासंदर्भात पाऊले उचलत असल्याचे सांगितले. या सर्व आवाहनाला प्रतिसाद देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले त्याबद्दलही खा. तटकरे यांनी सुरुवातीलाच त्यांचेही आभार मानले. या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.