X: @therajkaran
मुंबई: उत्तर पश्चिम मुंबईत अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी एकतर्फी जाहीर केल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार संजय निरुपम यांनी संताप व्यक्त केला आहे.
खिचडी घोटाळ्यात चेकने लाच स्वीकारणारा भ्रष्टाचारी अमोल कीर्तिकर महाविकास आघाडीचे (मविआ) उमेदवार कसे, उरल्या सुरल्या सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही, अशी संतप्त भूमिका ज्येष्ठ नेते निरुपम यांनी सोशल मीडियावर मांडली आहे.
अंधेरी येथील एका कार्यक्रमात काल उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी घोषित केली. मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अजून अंतिम झाला नसताना शिल्लक सेनेच्या प्रमुखांनी कीर्तिकर यांची उमेदवारी घोषित करून आघाडीचा धर्म मोडला आहे, असा घणाघात निरूपम यांनी केला. कोरोनाच्या काळात गरीब मोलमजुरांना दोनवेळच्या जेवणाची मारामार होती. त्यावेळी या सर्वांना उपासमारीची धग लागू नये म्हणून खिचडी पुरवण्याचे पाऊल मुंबई महापालिका प्रशासनाने उचलले होते. खिचडी पुरवठा करण्यासाठी ज्या कंत्राटदाराची निवड करण्यात आली होती, त्याच्याकडून अमोल कीर्तिकर यांनी लाच घेतली होती आणि ही लाचेची रक्कम चक्क चेकच्या स्वरूपात घेण्यात आली, असा आरोप कीर्तिकर यांच्यावर आहे. तब्बल ५२ लाख रुपये कीर्तिकर यांच्या खात्यात जमा झाले असल्याचे समोर आले होते. मात्र ही रक्कम आपणास पगार म्हणून देण्यात आली असल्याची सारवासारव कीर्तिकर यांनी गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या चौकशीत केली. गरीब मजुरांच्या पोटावरच लाथ मारून त्यांच्या ताटातील खिचडीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप असणाऱ्या लाचखोर कीर्तिकर यांना उमेदवारी दिली तर मविआचा पराभव निश्चित होईल, असा पवित्रा निरुपम यांनी घेतला आहे.
मुळातच अंतिम जागावाटप ठरले नसताना ठाकरे यांनी उमेदवारी का जाहीर केली, महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये जाणूनबुजून काँग्रेसचा अपमान केला जात असून काँग्रेस श्रेष्ठींनी याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशीही मागणी संजय निरुपम यांनी केली.