मुंबई
अशोक चव्हाण तत्वांविषयी बोलले तर लोक त्यांच्यावर हसतील, त्यामुळे त्यांनी विचारधारा, आदर्श, तत्व याविषयी बोलू नये; अशा शब्दात संजय राऊतांनी चव्हाणांवर बोचरी टीका केली. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला.
अशोक चव्हाणांवर बोलताना ते पुढे म्हणाले, चव्हाणांच्या कुटुंबाचं अख्खं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं. काँग्रेसने त्यांना सगळं दिलं. तरी ते सोडून गेले. त्यामुळे तत्वांवर बोलणं अशोक चव्हाणांना शोभत नाही. अशा परिस्थितीत लढणारे लोक तत्वांवर बोलू शकतात. अशोक चव्हाण जर विचारधारा, तत्व, आदर्श यावर बोलले तर लोक त्यांच्यावर हसतील. त्यामुळे चव्हाणांनी जो मार्ग निवडला आहे, त्यावर कायम राहावं, असंही राऊत यावेळी म्हणाले.
संजय राऊतांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही भाष्य केलं. दिल्लीतील शेतकरी प्रमुखांच्या आम्ही संपर्कात असून महाराष्ट्र या आंदोलनात काय योगदान देऊ शकेल, याबाबत निर्णय घेऊ असंही राऊत यावेळी म्हणाले.
दिल्लीतील शेतकरी देशातील शेतकऱ्यांचं नेतृत्व करीत आहेत. मात्र ज्या पद्धतीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे, ते योग्य नाही. आतापर्यंत १०० हून अधिक शेतकरी जखमी झाले असून अनेकांना अटक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी मोठं तुरुंग उभारण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी परदेशात आहेत तर या प्रकरणावर अमित शहांनी एक शब्दही काढलेला नाही. कृषी मंत्र्यांना बोलण्याचा अधिकारही देण्यात आलेला नाही. आज शेतकऱ्यांनी भारत बंदची घोषणा केली आहे, मात्र हा संदेश संपूर्ण देशात पोहोचवण्यात आलेला नाही, असंही राऊत यावेळी म्हणाले.